सिडनी / वृत्तसंस्था
पाकिस्तानचा लेगस्पिनर शदाब खान उर्वरित बिग बॅश लीग स्पर्धेकरिता दोनवेळचे विजेते सिडनी सिक्सर्स संघाशी करारबद्ध झाला. ऑफस्पिनर बेन मनेती व स्टीव्ह ओकिफे दुखापतीमुळे खेळणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर सिडनी प्रँचायझीने शदाबला करारबद्ध केले. 23 वर्षीय शदाबने आपल्या टिन-एजमध्येच पाकिस्तानतर्फे तिन्ही क्रिकेट प्रकारात आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले असून आजवर त्याने 64 टी-20 सामन्यात 7.11 च्या इकॉनॉमी रेटने 73 बळी घेतले आहेत.
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सर्वही 6 सामने खेळत त्याने 9 बळी घेतले. यात 26 धावात 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या त्या लढतीत शदाबने वॉर्नर, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल, असे मोहरे टिपले होते. उर्वरित बिग बॅश हंगामात सिडनी सिक्सर्सचे दोन सामने अनुक्रमे सिडनी थंडर (दि. 26) व ब्रिस्बेन हिट (दि. 29) यांच्याविरुद्ध होणार आहेत. त्यानंतर ते पुढील दोन सामने खेळण्यासाठी कॉफ्स हार्बरला रवाना होतील.