टोकियो ऑलिम्पिक – सुतिर्था मुखर्जी पराभूत,
टोकियो / वृत्तसंस्था
भारताची आघाडीचा टेबलटेनिसपटू शरथ कमलने संथ सुरुवातीनंतरही पोर्तुगालच्या तियागो अपोलोनियाला मात देत पुरुष एकेरीच्या तिसऱया फेरीत धडक मारली. महिला एकेरीत मनिका बात्रा व सुतिर्था मुखर्जी यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले.
39 वर्षीय शरथने 49 मिनिटांच्या लढतीत 2-11, 11-8, 11-5, 9-11, 11-6, 11-9 अशा फरकाने विजय संपादन केला. आता पुढील फेरीत त्याची लढत चीनच्या विद्यमान विजेत्या मा लाँगविरुद्ध होईल. सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक गणला जाणारा लाँग विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन आहे.
‘मी आतापर्यंत खेळलेला हा सर्वोत्तम सामना होता. पहिल्या गेममध्ये नेमके काय झाले, ते माझ्या लक्षात आले नाही. पण, तेथून मला वेळीच माझा खेळ उंचावता आला. माझ्या प्रतिस्पर्ध्याला वेगळा शरथ अपेक्षित नसेल. पण, मी माझ्या बॅकहँड फटक्याच्या बळावर त्याला जेरीस आणले. मागील 6 महिन्यात मी बॅकहँड फटक्यावर बरीच मेहनत घेतली आहे’, असे शरथने यावेळी नमूद केले.
शरथ एरवी आपल्या फोरहँड विनर्ससाठी अधिक ओळखला जातो. मात्र, बॅकहँडच्या स्तरावर बरीच सुधारणा केली असल्याने आता तो आणखी प्रगल्भ खेळ साकारण्यात यशस्वी होत आला आहे. मा लाँगच्या या इव्हेंटमधील वाटचालीबाबात तो म्हणाला, ‘मा लाँग अद्याप खेळलेला नाही. त्याला पहिल्या दोन्ही फेऱयात पुढे चाल मिळाली आहे. त्यामुळे, त्याच्यावर दडपण असेल. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी इतका सरस खेळ कधीच साकारला नव्हता. त्यामुळे, पुढील लढतीत देखील माझे मनोबल उंचावलेले असेल’.
मनिकाला पराभवाचा धक्का
एकीकडे, शरथने धमाकेदार विजय साकारलेला असताना दुसरीकडे, महिला एकेरीत मनिका बात्राचा पराभव मात्र भारतासाठी जिव्हारी लागणारा ठरला. मनिकाला ऑस्ट्रियाच्या सोफिया पोल्कानोव्हाविरुद्ध 0-4 फरकाने एकतर्फी पराभव पत्करावा लागला. ही लढत अवघ्या 27 मिनिटातच निकाली झाली.
बात्रा व सोफिया यांच्यात प्रारंभी बरीच जुगलबंदी रंगली. मात्र, नंतर अचानक बात्राचा सूर हरवला आणि सोफियाने तिच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. सोफियाने पहिला सेट 11-8 असा जिंकल्यानंतर दुसऱया सेटमध्ये केवळ 4 मिनिटातच 11-2 अशी बाजी मारली. उर्वरित लढतीतही सोफियाने सरस खेळाची परंपरा कायम राखली आणि सहज विजय संपादन केला.
सुतिर्था स्पर्धेबाहेर
भारताची आणखी एक टेटेपटू सुतिर्था मुखर्जी चीनच्या 42 वर्षीय यू फू हिच्याविरुद्ध सरळ सेट्समध्ये पराभूत झाली. 98 व्या मानांकित सुतिर्थाला 3-11, 3-11, 5-11, 5-11 अशा फरकाने 23 मिनिटातच अपयशाचा सामना करावा लागला.
ऐतिहासिक पदार्पणात लढवय्या भवानी देवी दुसऱया फेरीत पराभूत
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिलीवहिली फेन्सर भवानी देवी दुसऱया फेरीत जरुर पराभूत झाली. मात्र, त्यापूर्वी तिने आपला लढवय्या बाणा दाखवण्यात किंचीतही कसर सोडली नाही. 27 वर्षीय भवानी देवीने टय़ुनिशियाच्या नादिया बेन अझिझीविरुद्ध पहिल्या फेरीत 15-3 असा दमदार विजय साकारला होता. पण, दुसऱया फेरीत रिओ ऑलिम्पिकची सेमी फायनलिस्ट प्रेंचमन ब्रुनेटविरुद्ध तिला पराभव पत्करावा लागला.
भवानी देवीने ब्रुनेटविरुद्ध आपली रणनीती चुकली असल्याचे मान्य केले. मात्र, या अनुभवाचा आपल्या पुढील वाटचालीत फायदा होईल, असे तिने आवर्जून नमूद केले. ‘ब्रुनेटविरुद्ध पहिल्या हाफमध्ये मी व्यवस्थित फेन्स केले नाही. दुसऱया हाफमध्ये मी यात बदल करण्याचा प्रयत्न केला. पण, तोवर उशीर झाला होता. जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फेन्सर्सना सामोरे जाण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी समाधानी आहे. फेन्सिंग हा अतिशय जलद खेळ आहे आणि बरेच भारतीय चाहते या निमित्ताने प्रथमच फेन्सिंग पाहत असतील. मी या सर्वोच्च व्यासपीठावर त्यांच्यासमोर खेळू शकले, याचा आनंद आहे’, असे भवानी देवी आपल्या या वाटचालीबद्दल बोलताना म्हणाली.
पुरुष तिरंदाजीत भारत कोरियाविरुद्ध पराभूत
उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत निर्णायक क्षणी निराशा केल्यामुळे भारतीय तिरंदाजी संघाला पुरुषांच्या सांघिक गटातून कोरियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यापूर्वी कझाकस्तानला 6-2 असे नमवणाऱया अतानू दास, प्रवीण जाधव, तरुणदीप राय या भारतीय त्रिकुटाला येथे मात्र कोरियन संघाविरुद्ध अपयश आले. किम जे डेओक, ओह जिन हेक व किम वूजिन यांनी पहिल्या दोन सेटमध्ये दमदार प्रदर्शन साकारत भारतावर दडपण आणले आणि भारतीय संघ यातून अजिबात सावरु शकला नाही.
भारतीय तिरंदाजी संघाने या इव्हेंटमध्ये यापूर्वी 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपचे रौप्य जिंकले होते. येथे मात्र त्यांना याची पुनरावृत्ती करता आली नाही. वर्ल्डकप सुवर्णजेता अतानू दासला 3 सेटमध्ये एकदाही 10 गुणांचा वेध घेता आला नव्हता. तिरंदाजीत आता भारताची मदार वैयक्तिक गटात पुरुष त्रिकुटावर तसेच दीपिका कुमारीवर असेल.
सात्विक-चिराग सरळ गेम्समध्ये पराभूत
बॅडमिंटन पुरुष दुहेरीतील सात्विकराज रणकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना इंडोनेशियाच्या अव्वलमानांकित मार्कस गिडेऑन फर्नाल्डी व केव्हिन सुकामुल्जो यांच्याकडून 13-21, 12-21 अशा फरकाने पराभवाचा धक्का सोसावा लागला. ही लढत केवळ 32 मिनिटातच निकाली झाली. आतापर्यंत झालेल्या लढतीत सात्विक-चिरागने या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पराभव पत्करण्याची ही तब्बल नववी वेळ ठरली. गिडेऑन व सुकामुल्जो आता गटात अव्वलस्थानी तर सात्विक व चिराग दुसऱया स्थानी विराजमान आहेत. सात्विक-चिराग आता इंग्लंडच्या बेन लेग व सीन व्हेन्टी यांना पराभूत करण्याचा प्रयत्न करतील.
स्कीटमध्ये अंगदला 18 वे तर मैराजला 25 वे स्थान
भारताच्या अंगद वीर सिंग बजवाला पुरुषांच्या स्कीट इव्हेंटमध्ये 18 वे तर मैराज अहमद खानला 25 वे स्थान मिळवता आले. 25 वर्षीय अंगदला 5 सिरीजमध्ये 120 तर मैराजला 117 गुणांवर समाधान मानावे लागले. पहिल्या सत्रात 11 व्या स्थानी राहिलेल्या आणि तीन फेऱयांमध्ये सरस कामगिरी साकारत फायनल्समध्ये धडक मारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अंगदला एकदाही सूर सापडला नाही. दुसरीकडे, मैराज देखील अपेक्षा पूर्ण करु शकला नाही.
भारतीय मुष्टियोद्धा आशिष कुमारचे आव्हान संपुष्टात
75 किलोग्रॅम वजनगटातील मुष्टियुद्धात भारताच्या आशिष कुमारला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. त्याला चीनच्या एर्बिएके तौहेताने 0-5 अशा एकतर्फी फरकाने मात दिली. 27 वर्षीय माजी आशियाई रौप्यविजेता आशिष पहिल्या फेरीत बॅकफूटवर फेकला गेला होता. अवघ्या तीनच मिनिटात ही लढत निकाली झाली. तौहेताची पुढील फेरीतील लढत ब्राझीलच्या हर्बर्ट सौसाविरुद्ध होणार आहे. आशिष कुमार हा यंदाच्या ऑलिम्पिकमधून बाहेर फेकला गेलेला एकूण तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी विकास कृष्णन (69 किलोग्रॅम) व मनिष कौशिक (63 किलोग्रॅम) यांना देखील पहिल्याच फेरीत पराभवाचे धक्के बसले.
मेदवेदेव्हविरुद्ध सुमित नागल पराभूत
टेनिसमधील पुरुष एकेरीत दुसऱया फेरीत धडक मारणाऱया सुमित नागलला जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित रशियाच्या डॅनिएल मेदवेदेव्हने 6-2, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. 160 व्या मानांकित सुमित नागलला येथे केवळ 66 मिनिटात पराभव मान्य करावा लागला. जागतिक स्तरावरील मेदवेदेव्ह आणि अद्याप नियमितपणे एटीपी टूर इव्हेंट खेळण्यासाठी झगडत असलेला सुमित नागल यांच्या खेळातील फरक स्पष्ट होण्यासाठी फारसा वेळ लागला नाही. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममधील उपविजेता मेदवेदेव्हने येथे प्रारंभापासूनच सुमित नागलवर सहज वर्चस्व गाजवले होते. नागलने यापूर्वी उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनला पहिल्या फेरीत नमवले, त्यावेळी भारतातर्फे हा ऑलिम्पिक पुरुष एकेरीत 25 वर्षानंतरचा पहिला विजय ठरला होता.