प्रतिनिधी /खानापूर
करंबळ, ता. खानापूर येथील ज्योतिर्लिंग मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झालेल्या व्यायामपटूंचा सत्कार तसेच पाटील कुटुंबीयांचा गेट-टूगेदर असा संयुक्त कार्यक्रम करंबळ क्रॉस येथील पाटील गार्डनमध्ये झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन राजाराम पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे संचालक शिवाजीराव पाटील, मारुती पाटील, पुंडलिक पाटील तसेच खानापूरचे नगरसेवक नारायण मयेकर उपस्थित होते. प्रारंभी ज्योतिर्लिंग सोसायटीचे सचिव एकनाथ पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झालेले नितीन राजाराम पाटील, राज गंगाराम गावडे व सनी नारायण मयेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. करंबळ ग्रा. पं. च्या अध्यक्षपदी निवड झालेल्या लक्ष्मी प्रल्हाद पाटील तसेच उपाध्यक्ष नारायण देवाप्पा पाटील यांचाही सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर शरीरसौष्ठवपटूंना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करणारी गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य परशराम चौगुले, महालक्ष्मी गो-शाळेचे संस्थापक भरमा पाटील, पत्रकार प्रकाश देशपांडे, स्नेहल पाटील, कुमारी गौरी पाटील, समारंभाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांची भाषणे झाली.
यावेळी शरीरसौष्ठवपटूंच्या वतीने केलेल्या सत्काराबद्दल पाटील यांनी संयोजकांना धन्यवाद दिले व शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेण्यासाठी करण्यात येत असलेल्या तयारीमध्ये शरीरसौष्ठवपटूला कसे कष्ट करावे लागतात, याची सविस्तर माहिती दिली. अजित पाटील यांनी आभार मानले.
यावेळी लायन्स क्लब व इतर विविध संस्थांच्यावतीनेही शरीरसौष्ठवपटूंचा सत्कार करण्यात आला.