आमदार नाईक यांनी घेतली आंदोलकांची भेट : सात महिन्यांपासून उलगडा न झाल्याने खेद व्यक्त
प्रतिनिधी / कारवार
कुटुंब नियोजनाच्या शस्त्रचिकित्सेच्यावेळी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हाती घेतलेल्या बेमुदत उपोषणस्थळी कारवार-अंकोलाच्या आमदार रुपाली नाईक यांनी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. बेमुदत उपोषण आंदोलनाचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. 3 सप्टेंबर 2020 रोजी येथील सर्वोदयनगरमधील गीता बानावळी हिचा कुटुब नियोजन शस्त्रचिकित्सेवेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे, असा आरोप करण्यात येत आहे. अगोदरपासूनच आमदार रुपाली नाईक मयत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे या मताच्या आहेत. इतकेच नव्हे तर संशयास्पद मृत्यूचे गूढ उघडकीला आणलेच पाहिजे आणि दोषीवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका आमदार नाईक यांनी घेतली आहे.
आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांना उद्देशून बोलताना रुपाली नाईक म्हणाल्या, घटना घडून सात महिने झाले आहेत. तरीही अद्याप गीताचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजायला मार्ग नाही. याबद्दल खेद व्यक्त केला. या प्रकरणाबद्दलची माहिती यापूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
आद्याच्या नावाने 1 लाख रुपयांची ठेव
इतकेच नव्हे तर आद्याच्या शिक्षणासाठी आमदार रुपाली नाईक यांनी 1 लाख ठेव ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शुक्रवारी अंकोला तालुक्यातील बेलेकेरी येथील मच्छीमारी बांधवांनी आंदोलनस्थळी हजेरी लाऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे राजू तांडेलसह प्रमोद बानावळी, गणपती बानावळी, विनायक हरिकंत्र आदी उपस्थित होते.
आमदार नाईक यांच्यामधील मातृत्व जागृत झाले
आंदोलनकर्त्या महिला मयत गीता बानावळी हिच्या सात महिन्यांच्या आद्या नावाच्या बालिकेला आंदोलनस्थळी घेऊन आल्या होत्या. त्या गोंडस बालिकेला पाहताच नाईक यांच्यामधील मातृत्व जागे झाले. आणि त्यांनी बालिकेला घेतले आणि काही वेळ आद्याबरोबर घालविला. हे पाहून आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या महिलाही भावनिक झाल्या.