प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. विशेषत: शर्कत पार्कजवळ खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आल्याने खड्डे बुजविण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले आहेत. पण तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी दर्जेदार रस्ता करावा अशी मागणी होत आहे.
खानापूर रोडसह शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने शहरातील कॅम्प मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर रोडवरील वाहतूक कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्याने वळविण्यात आली आहे. ग्लोब थिएटरपासून शौर्य चौक आणि तेथून अरगन तलावमार्गे सर्वप्रकारची वाहतूक ये-जा करत आहे. अवजड वाहने देखील या मार्गाने वळविण्यात आल्याने संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शर्कत पार्कजवळ रस्ता खराब झाल्याने खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीचा सामना देखील वाहनधारकांना करावा लागत आहे. खड्डय़ांमुळे अपघात होत असल्याने हा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी कॅन्टोन्मेंटकडे केली होती. पण निधी नसल्याचे सांगून रस्ता करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांना देखील माहिती देण्यात आली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 40 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. पण कॅन्टोन्मेंट बोर्डने केवळ डागडुजीचे काम हाती घेतले आहे. केलेली डागडुजी काही महिन्यातच उखडून जाते. त्यामुळे दर्जेदार रस्ता बनविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.