प्रतिनिधी/ बेळगाव
हुक्केरी तालुक्मयातील इस्लामपूर ग्राम पंचायतीच्या संगणक ऑपरेटरने पैशासाठी संपूर्ण गावाला वेठीस धरले आहे. त्या विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक संस्थेतर्फे जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढून जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. बी. आर. आंबेडकर आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी गोर-गरीब जनतेला 40 ते 50 हजार रुपये अनुदान देण्यात येते. ते अनुदान देण्यासाठी ग्राम पंचायतीच्या संगणक ऑपरेटरने 10 हजार रुपये घेतले आहेत. महिलांची फसवणूक करून ही रक्कम लाटली आहे. पैसे द्यायचे असल्यासच ग्राम पंचायतीकडे या अन्यथा ग्राम पंचायतीकडे फिरकूही नका, अशी धमकी देण्यात आली.
दरम्यान, उद्योग खात्री योजनेंतर्गत कामांची योग्य माहिती देखील संबंधित ग्राम पंचायतीचे अधिकारी देत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. त्या विरोधात भ्रष्टाचार निर्मूलन सामाजिक संस्थेतर्फे जिल्हा पंचायतसमोर ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
यावेळी अडव्याप्पा कुंबरगी, कविता मुरकुटे, ऍड. एन. आर. लातूर, ऍड. नामदेव मोरे, माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई, राहुल पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.