आघाडीच्या 100 कंपन्यांमध्ये 3 भारतीय कंपन्या
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या अंतर्गत भारत शस्त्रास्त्रनिर्मितीत आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. याचाच परिणाम म्हणून जगातील आघाडीचय 100 कंपन्यांमध्ये भारताच्या 3 कंपन्यांनी स्थान मिळविले आहे. स्वीडिश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीटय़ूटच्या अहवालानुसार हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन ऑर्डनेंस फॅक्ट्रीजला आघाडीच्या 100 कंपन्यांमध्ये सामील करण्यात आले आहे.
भारतीय कंपन्यांच्या एकूण शस्त्रास्त्रांची विक्री मागील वर्षी 6.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 48,750 कोटी रुपये) राहिली आहे. 2019 च्या तुलनेत हा आकडा 1.7 टक्क्यांनी अधिक आहे. याचबरोबर आघाडीच्या 100 कंपन्यांच्या एकूण विक्रीच्या तुलनेत हे प्रमाण 1.2 टक्के आहे.
अमेरिका अव्वल
सैन्य उपकरणांच्या निर्मितीत अमेरिका आघाडीवर आहे. थिंक टँकच्या अहवालानुसार आघाडीच्या 100 कंपन्यांमध्ये सर्वाधिक 41 कंपन्या अमेरिकेतील आहेत. त्यांच्या शस्त्रास्त्रांची विक्री 285 अब्ज डॉलर्स राहिली, हा आकडा 2019 च्या तुलनेत 1.9 टक्क्यांनी अधिक आहे.
5 चिनी कंपन्यांना मिळाले स्थान
आघाडीच्या 100 मध्ये चीनच्या 5 कंपन्या सामील आहेत. अहवालानुसार या कंपन्यांची एकूण शस्त्रास्त्रांची विक्री मागील वर्षी 66.8 अब्ज डॉलर्स इतकी राहिली. 2019 च्या तुलनेत हा आकडा 1.5 टक्क्यांनी अधिक आहे. अहवालानुसार आघाडीच्या 100 शस्त्रास्त्रांच्या विक्रीत चीनची हिस्सेदारी 13 टक्के आहे.
मेक इन इंडिया
देशांतर्गत खरेदीने भारतीय कंपन्यांना महामारीच्या नकारात्मक आर्थिक परिणामांपासून वाचण्यास मदत झाली आहे. मागील वर्षी भारत सरकारने स्वदेशी कंपन्यांना पाठबळ देत शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी 100 हून अधिक सैन्य उपकरणांच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.