टाटा स्टील नफ्यातः ओमिक्रॉनच्या अहवालाने दिलासा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारामध्ये मागील दोन सत्रात राहिलेल्या घसरणीला अखेर पूर्ण विराम मिळाला असून मंगळवारी सेन्सेक्स तब्बल 887 अंकांनी मजबूत होत स्थिरावला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये जागतिक बाजारातील स्थिती सकारात्मक राहिल्याचा लाभ भारतीय बाजाराला झाल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीत राहिले होते.
कोविड 19चे नवीन स्वरुप ओमिक्रॉनबाबत दिलासादायक मुद्दे समोर आल्याने यामधून काहीसा दिलासा बाजाराला मिळाल्याचे सांगितले जात आहे. सदरच्या अहवालात हा नवा विषाणू वेगाने पसरतो, परंतु त्याचा प्रभाव हा डेल्टा स्वरुपापेक्षा कमी असल्याची माहिती समोर आल्याने बाजारात उत्साह परतल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 886.51 अंकांनी मजबूत होत 57,633.65 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 264.45 अंकांनी वधारत 17,176.70 वर बंद झाला आहे. याच दरम्यान टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी मजबूत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, भारतीय स्टेट बँक आणि बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीत होते, तर दुसऱया बाजूला मात्र एशियन पेन्ट्सचे समभाग घसरणीत राहिले होते.
स्वस्त दरातील समभागांना पसंती
जागतिक पातळीवरील वातावरण सकारात्मक राहिल्यानेच घसरणीला विराम देत बाजार सावरला असल्याचे दिसून आले. साधारणपणे गुंतवणूकदारांकडून स्वस्त व चांगल्या समभागांची अधिकची खरेदी झाल्याच्या स्थितीमुळे बाजारात सकारात्मक स्थिती राहिली होती. आशियातील अन्य बाजारांमध्ये चीनचा शांघाय कम्पोझिट, हाँगकाँगचा हँगसेंग, दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्की हे लाभात राहिले आहेत.