ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी महाराष्ट्रात रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. विशेषतः मुंबईला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचे चित्र आहे. मुंबईत मार्च- एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 10 ते 11 हजारांवरुन आता थेट 2 हजारांवर आली आहे.
मुंबईत मार्च- एप्रिलमध्ये करोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. आता मात्र, कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसत आहे. सद्य स्थितीत कोरोना रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. मागील 24 तासात मुंबईत 2 हजार 403 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 3,375 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
- रुग्ण दुप्पटीचा कालावधी 153 दिवस
काही दिवसांपूर्वी शहरातील सरासरी रुग्ण दुप्पटीचा कालावधी 40 दिवसांवर घसरला होता. तो आता सरासरी 153 दिवसांपर्यंत वाढला आहे. तर, रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तर आतापर्यंत मुंबईत 6 लाख 13 हजार 498 जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- 47,416 ॲक्टिव्ह रुग्ण
दरम्यान, रविवारी मुंबईतील 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 13 हजार 817 जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर, सध्या 47 हजार 416 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.