जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यात उपक्रम
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जागतिक कर्करोग दिनानिमित्त 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘तंबाखूची प्रतिकात्मक होळी’ हा उपक्रम माध्यमिक शाळांमध्ये तंबाखूमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या नव्या पिढीत व्यसनविरोधी संस्कार करून महाराष्ट्राची नवी पिढी व्यसनमुक्त आणि आरोग्यसंपन्न राखणे, हे याचे प्रमुख उद्दीष्ट आहे. जिल्हा शिक्षण विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सलाम मुंबई फाउंडेशन महाराष्ट्रात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये हे अभियान राबवत आहे.
जिह्यातील स्थानिक संस्था, संघटनांच्या प्रयत्नांतून यवतमाळ व वर्धा जिह्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच नंदुरबार व धुळे जिह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तंबाखूमुक्त जाहीर झाल्या आहेत. यावर्षीही राज्यातील 10 जिल्हे तंबाखूमुक्त शाळांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील 2 वर्षे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधत शालेय शिक्षण विभागाच्या पुढाकारात तंबाखूविरोघी उपक्रम महाराष्ट्रात आयोजित केले जात आहेत.
2018 रोजी ‘तंबाखूमुक्त जीवन संकल्प’ उपक्रम राज्यातील सर्व शाळांत आयोजित केला गेला. 2019 ला आपण ‘एक पत्र व्यसनमुक्तीसाठी’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांद्वारे 350 कुटुंबे व्यसनमुक्त बनली. या विद्यार्थ्यांचा ‘महाराष्ट्रभूषण’ आणि मार्गदर्शक शिक्षकांचा ‘महाराष्ट्ररत्न’ सन्मानपत्र देऊन 2 ऑक्टोबर 2019 ला सन्मान करण्यात आला. आता 4 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये ’तंबाखूची प्रतिकात्मक होळी’ हा उपक्रम आयोजित होत आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांत व्यसनमुक्तीचे संस्कार होण्यास मदत होईल. यावर्षी विद्यार्थ्यांद्वारे 30,000 कुटुंबे तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
विद्यार्थी आपल्या शाळेत तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करतील, तिथे महाराष्ट्र शिक्षण विभागाचा तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घेतला जाईल. त्या आधी शिक्षक विद्यार्थ्यांना तंबाखूचे होणारे दुष्परिणाम, तंबाखू व्यसन सोडण्याचे फायदे आणि युक्त्या सांगतील आणि आपले कुटुंब व्यसनमुक्त राखण्यासाठी प्रेरणा देतील. या उपक्रमामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक, तंबाखूजन्य पदार्थ सोडतील आणि 15 ऑगस्ट 2020 पर्यंत तंबाखूमुक्त राहतील, त्या विद्यार्थ्यांना सलाम मुंबई फाउंडेशनकडून ‘महाराष्ट्रभूषण’ आणि मार्गदर्शक शिक्षकांचा ‘सन्मानपत्र’ 2 ऑक्टोबरला प्रदान करण्यात येईल.