बढतीवर बदल्यांची भिती दाखवून पैसे उकळत असल्याची चर्चा : कर्मचाऱयांमध्ये अस्वस्थता
प्रतिनिधी/सांगली
सहकार विभागातील लेखापरीक्षक कार्यालयात सध्या बढत्या आणि बदल्यांचा हंगाम सुरू आहे. याचा गैरफायदा उठवत काहीजणांनी बदल्यांचा बाजार सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामुळे कर्मचाऱयांमध्ये असंतोष आणि अस्वस्थता पसरली आहे. कोरोना महामारीमुळे अडचणीत आलेल्या कर्मचाऱयांनी वरिष्ठांची मागणी पूर्ण करण्यासाठी लेखारिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेत कर्जप्रकरणे टाकण्यास सुरवात केली असल्याची चर्चा सुरू आहे.
विभागीय सहनिबंधकांकडे यासंदर्भात तक्रारी झाल्या असून न्याय न मिळाल्यास सहकार मंत्र्यांची भेट घेण्याची तयारीही कर्मचाऱयांनी सुरू केली आहे. यासंदर्भात समजलेली माहिती अशी, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) कोल्हापूर विभागाअंतर्गत सध्या कर्मचाऱयांच्या बदल्या आणि बढत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लिपिक, उपलेखापरीक्षक, लेखापरीक्षक श्रेणी 1 च्या कर्मचाऱयांच्या बदल्यांची यादी तयार करण्यास सुरवात झाली आहे.
अनेक वर्षे रखडेल्या बढत्या सुरू झाल्याने कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतून या विभागातीलच `झारीतील शुक्राचार्यानी’ या संधीचा लाभ उठवण्यास सुरवात केली आहे. कर्मचाऱयांच्या अडचणींचा विचार न करता सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी 70 हजार ते दीड लाखापर्यंतचा दर काढल्याची चर्चा सुरू आहे. या दोघा वरिष्ठांची मागणी जे मान्य करतील त्यांची सोयीच्या ठिकाणी तर अन्य कर्मचाऱयांना मर्जीप्रमाणे गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. वरिष्ठांचा निरोप असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे बढतीने बदलीपात्र कर्मचाऱयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्वाचीच आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्याला या विभागातील कर्मचारीही अपवाद नाहीत. त्यामुळे वरिष्ठांची मागणी पूर्ण कशी करायची याची चिंता या कर्मचाऱयांना लागली आहे. परंतु घोडेबाजारात टिकायचे असेल तर हातपाय हलवलेच पाहिजेत या हेतून काहींनी सह.पतसंस्थेत कर्जप्रकरणे करण्यास सुरूवात केली असल्याचेही समजते. विभागीय सहनिबंधकाकडे यासंदर्भात तक्रारी गेल्या आहेत.बढती आणि बदल्यांचा बाजार चालवण्यासहाठी त्यांच्या नावाचाही आधार घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे न्याय न मिळाल्यास, जाणीवपूर्वक गैरसोयीच्या बदल्या केल्यास कर्मचाऱयांनी सहकार आयुक्त आणि सहकार मंत्र्यांना भेटण्याची तयारी सुरू केली असल्याचीही माहिती सुत्रांकडून सांगण्यात आली.
चौकशी करणार : सहनिबंधक कवडे
लेखापरीक्षण विभागातील पदोन्नती आणि बदल्या या पारदर्शीप्रमाणेच होतील. कोणाचीही जाणीवपूर्वक गैरसोय करण्याचा हेतू नाही. आपल्याकडेही याबाबत कोणीतरी तक्रार केली आहे. पण ही चर्चा गंभीर असून याची चौकशी करणार असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक तानाजी कवडे यांनी `तरुण भारत’शी बोलताना दिली. पैसे मागणी वगैरे असा कोणताही प्रकार नसल्याचेही त्यांनी सांगितले.