सातारा/प्रतिनिधी
शाहूनगर मध्ये सोलापूर हुन आलेले 3 जण कोरोना बाधित सापडले पण त्यामुळे शाहूनगर मध्ये प्रचंड भीती वाढली. त्यामुळे विविध संस्थांच्या वतीने गुरुवारी सकाळी विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. अजिंक्य चौक येथे “मी रक्षक, माझ्या साताऱ्याचा”चे संस्थापक राजेंद्र चोरगे, शहर पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ झाला. लोकांमधील भीती निघून जावी म्हणून येथे भान राखून उपस्थितांची टेम्प्रेचर गन व ऑक्सिमिटर च्या साह्याने तपासणी करण्यात आली.
परिसर केला सॅनिटाईज
दत्त कॉलोनी व परिसर सवयभान व गुरुकुल परिवाराच्या वतीने सॅनिटाईज करण्यात आला. तर सवयभान राहावे म्हणून पत्रक देण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांच्या वतीने परिसरातील जवळच्या बहुतेक सर्व कॉलोनीतल्या घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करण्यात आलीय शिवाय आर्सेनिक अलबमच्या गोळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
दरम्यान, दत्त कॉलोनी मधील सर्व नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून कॉलोनीमधील लोक पूर्ण काळजी घेत असल्याचे निरंजन शेजवळकर यांनी यावेळी सांगितले.
कोरोना योद्धा मनोज जाधव यांचा वाढदिवस
शाहूनगर मधील रहिवासी व पोलीस दलात कार्यरत असलेल्या मनोज जाधव यांनी लॉक डाऊनच्या काळात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांचा मांजरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दुकानदार नवनाथ गडदे यांचे कौतुक
दत्त कॉलोनी मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर झाली आहे. याला लागूनच नवनाथ गडदे यांचे कृष्णाई हे दुकान आहे. दुकानाच्या निमित्ताने गर्दी होऊ नये म्हणून स्वतः हुन दुकान बंद ठेवत ग्राहकांना घरोघरी जाऊन सेवा देण्याबद्दल त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.
सवयभान आले, भीती पळाली
गुरुवारी सकाळी झालेल्या या विविध व सलगच्या उपक्रमामुळे शाहूनगर मधील भीती पळाली आणि सवयभान आले, असे चित्र होते.
रवी पवार यांचा पुढाकार
शाहूनगर असो की पूर्ण सातारा असो प्रत्येक चांगल्या उपक्रमांत योगदान देणाऱ्या गोडोली येथील “परोपकारी रवी” म्हणजेच रवी पवार यांनी याही वेळी पुढाकार घेतले. प्रत्येक घरी जाऊन लोकांची तपासणी व गोळ्यांचे वाटप करण्यात दुपारी उशिरापर्यंत त्यांचे काम सुरूच होते.
उपक्रमांना सवयभानचे सचिव मनोज देशमुख, चंद्रशेखर घोडके, वर्षाताई देशपांडे, जयदीप शिंदे, निरंजन शेजवळकर, संजय केंडे, युवराज दबडे, प्रशांत पिलावरे, दीपक प्रभावळकर आदी उपस्थित होते.