मुख्यमंत्री बोम्माई यांनी विधानपरिषदेत दिली माहिती
बेळगाव : विविध प्राथमिक-माध्यमिक शाळा व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये अनेक जागा रिक्त झाल्या आहेत. त्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील. हैदराबाद-कर्नाटकमधील 5 हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच राज्यातील इतर भागांमध्ये 10 हजार रिक्त जागा अशा एकूण 15 हजार जागा भरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानपरिषदेत दिली आहे.
शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक जागा रिक्त झाल्या असताना त्या भरण्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. तेव्हा त्या जागा लवकरात लवकर भराव्यात, अशी मागणी विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, वाय. नारायण, पुट्टण्णा या सदस्यांनी केली होती. त्यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी कोविडमुळे समस्या निर्माण झाली होती. अर्थ विभागाकडून मान्यता मिळणे गरजेचे होते. आता अर्थ विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे राज्यातील रिक्त 15 हजार शिक्षकांच्या जागा लवकरच भरल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.
हैदराबाद-कर्नाटक, मुंबई-कर्नाटक या विभागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची मी पुरेपूर माहिती घेतली आहे. असे असले तरी ही प्रक्रिया अर्थ विभागाकडे थांबून होती. अर्थ विभागानेही आता अर्थ व्यवस्था रुळावर येत असल्याने रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी संमती दिली आहे. त्यामुळे लवकरच या जागा भरल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.