शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांची माहिती : लवकरच अधिकृत आदेश
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापकांच्या बदल्यांना विलंब झाला असून ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बुधवारी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याच्या मुख्य सचिवांना केली होती. त्यानुसार शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी 5 नोव्हेंबरपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होईल. याबाबतचे वेळापत्रक गुरुवारी प्रसिद्ध करण्यात येईल, असे फेसबुक पेज आणि ट्विटरद्वारे सांगितले आहे.
राज्य सरकारने राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापकांच्या बदल्यांसंबंधी पाच महिन्यांपूर्वीच मार्गसूची जारी केली होती. मात्र, बदल्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. कोरोना परिस्थितीमुळे बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे बदल्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी होती. दरम्यान, बुधवारी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना बदल्यांबाबत निर्णय घेण्याची विनंती केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शिक्षण खात्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याबाबत आजच (बुधवार) निर्णय घ्या, अशी सूचना दिली होती. त्यानुसार शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी बदल्यांची प्रक्रिया 5 नोव्हेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती दिली आहे. मागीलवर्षी सक्तीच्या आणि अतिरिक्त बदल्या झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांना यंदा अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. याबाबत त्वरित अधिसूचना जारी करण्याची सूचना शिक्षण खात्याच्या आयुक्तांना दिली आहे, असे ते म्हणाले.