प्रतिनिधी/ बेळगाव
चंदगड तालुक्यातील शिनोळी आणि कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱया तुरमुरी चेकपोस्टवरून बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात यावी. मात्र, यामधून अत्यावश्यक सेवा, गंभीर आजार असलेले रुग्ण आणि रुग्णवाहिकांना येण्या-जाण्यास मुभा देण्यात यावी, अशी सूचना बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी केली आहे. आमदारांनी शनिवारी शिनोळी व तुरमुरी या दोन्ही राज्यांच्या चेकपोस्टना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. या चेकपोस्टवरून आंतरराज्य बेकायदा वाहतूक रोखली पाहिजे. मात्र, यातून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱयांना सवलत व परवानगी द्यावी, अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी महाराष्ट-कर्नाटक पोलीस तसेच संबंधित अधिकारीवर्गास केली.
चंदगड तालुक्यातील नागरिकांचे बेळगाव शहराशी अनेक प्रकारांनी नाते जुळले आहे. खरेदीसाठी तसेच औषधोपचारासाठीही चंदगडवासीय नेहमीच बेळगावला येत असतात. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे या चेकपोस्टवर त्यांची अडवणूक सुरू आहे. मात्र, यामध्ये गंभीर आजारी तसेच रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवा देणाऱयांचीही अडवणूक होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सर्पदंश झालेल्या चंदगड तालुक्यातील एका इसमावर वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी त्याला बेळगावला आणण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र, चेकपोस्टवर त्यांना प्रवेशासाठी परवानगी देण्यात आली नाही. यामुळे जीव गमवावा लागला.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीररीत्या प्रवेश देण्यात येऊ नये, असा सक्त आदेश देण्यात आला आहे. यामुळे तुरमुरी चेकपोस्टवर पोलिसांच्यावतीने खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र, याचा फटका रुग्णवाहिका, गंभीर आजार असणारे रुग्ण तसेच अत्यावश्यक सेवा पुरविणाऱया व्यक्तींना बसत आहे. याची दखल घेऊन आमदार अनिल बेनके यांनी शनिवारी शिनोळी व तुरमुरी चेकपोस्टला भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्रीकांत देसाई उपस्थित होते. आमदार अनिल बेनके यांच्या विनंतीला मान देऊन चेकपोस्टवरील पोलीस व संबंधित अधिकाऱयांनी अत्यावश्यक सेवा आणि रुग्णवाहिकांना यातून वगळण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे..