तिन्ही घटनेत सुमारे 5 लाखांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी/ सातारा, भुईंज
शिरवळ (ता. खंडाळा) येथील रामेश्वर कॉलनीतील शिवसदन बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसून अज्ञात चोरटय़ांनी 2 लाख 58 हजार रुपये किंमतीचे दागिने व 1 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना दि. 21 रोजी घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्याचबरोबर भुइंं&ज (ता. वाई) येथील महामार्गालगत दोन घरे फोडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार अशोक उत्तमराव गाजरे (वय 46, रा. रामेश्वर कॉलनी, शिरवळ, ता. खंडाळा) यांचे बिल्डिंगच्या खालीच हार्डवेअरचे दुकान आहे. ते नेहमी जातात तसेच फ्लॅटच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावली आणि आपल्या दुकानात गेले होते. नेमकी हीच संधी साधात अज्ञात चोरटय़ांनी कडी काढून घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत चोरटय़ांनी बेडरुममधील कपाटात ठेवलेले 2 लाख 58 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच 1 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम घेवून पोबारा केला आहे.
गाजरे बाहेरुन आल्यावर त्यांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. डॉग स्कॉड मागवण्यात आले मात्र डॉग घराच्या परिसरात घुटमळत राहिल्याने पुढील माग मिळाला नाही. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट देवून तपासाबाबत सूचन केल्या आहेत. या घरफोडीचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. अरगडे करत आहेत.