महाड / प्रतिनिधी :
भागवत परंपरेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी हिंदुस्थानाच्या पहिल्या दुर्ग राजधानीवरुन पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. श्रीशिवराय हे अभिषिक्त छत्रपती असल्याने त्यांच्या राजोपचार पूजेसाठी गजशाळा, अश्वशाळा, गोशाळा, राजमंदिर व तुलसी वृंदावन येथील पावन मृत्तिका आणि एकवीस गंगांचे पवित्र जल गडावर आणवले गेले होते. श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांवर षोडषोपचाराने रुद्राभिषेक झाल्यानंतर, श्रीवाडेश्वर महादेव व शिर्काई देवीची महापूजा बांधून श्रींच्या पादुका गड उतरल्या. शिवछत्रपतींच्या पादुकांना निरोप द्यायला आलेल्या रायगडावरील औकीरकरांचे डोळे विरहाने भारावून अक्षरशः पाणावले.
पाचाडमधील मातोश्री जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी पूजा बांधून मुजरे झडल्यानंतर सोहळ्यास निरोपाचे विडे दिले गेले. नंतर शिवरायांचा सोहळा पंढरीच्या दिशेने प्रतिकात्मक चाल करुन पुनाडे गावातील मारुती मंदिरात पहिल्या विसाव्यासाठी दाखल झाला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ ५ च शिवभक्त राजाभिषेकापासून श्री रायगड चरणांशी विसावलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन, प्रस्थान महापूजा करुन नाणे दरवाज्याने हिरकणीवाडी, पाचाड मार्गे देशमुख हॉटेलच्या अनंत देशमुख यांच्याकडे प्रस्थान महाप्रसाद घेऊन जिजाऊंच्या समाधी दर्शनास गेले.
आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिधारास्वरूप शिवरायांच्या पादुका श्रीक्षेत्र पंढरपुरी, आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विठ्ठलाच्या पायांशी आपली वारी पोहचवतील. आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर आषाढ शुद्ध चतुर्दशी, दि. २३ जुलै २०२१ ला पुन्हा राजधानी रायगडी येऊन वारी पूर्ण केली की पुढील वर्षभराच्या निवासासाठी या पादुका परत शिवजन्मभूमी शिवनेरीवर जात असतात. श्रीशिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ७ वे वर्ष आहे.
कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या विपरित परिस्थितीमुळे सामाजिक आरोग्याचे भान राखत संख्येची आत्यंतिक अल्प मर्यादा सोहळा व्यवस्थापन समन्वय समितीकडून राखली गेली आहे. प्रस्थान महापूजा झाल्यानंतर श्रीशिवछत्रपती समाधी मेघडंबरीपासून श्रीशिवछत्रपतींच्या पादुका पंढरीस घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी योगऋषी सुधीर इंगवले, ह.भ.प. साहिलबुवा शेख, ह.भ.प. अजित शिंदे, ह.भ.प. कार्तिक भंडारे, पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाली आहे.