उत्सवाबाबत शासनाकडून सूचना जाहीर
सावंतवाडी:
छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती उत्सव 19 फेब्रुवारीला साजरा होणार आहे. मात्र, यंदा कोविड-19 मुळे हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाने मार्गदर्शक परिपत्रकातून केले आहे. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शिवजंयती साजरी करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी केले आहे. या दिवशी अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. व्याख्यान, पोवाडे, गाणे, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये, असे परिपत्रकात शासनाने नमूद केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फक्त दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, प्रभात फेरी अशा कार्यक्रमाचे आयोजन करू नये. त्याऐवजी आरोग्य शिबीर, स्वच्छता जनजागृती अशा कार्यक्रमांचे आयोजन करावेत. शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत खोत यांनी केले आहे.