शहरवासियांकडून ऐतिहासिक शिवजयंतीच्या प्रथेचे पालन : प्रातिनिधिक स्वरुपात झाले शिवपूजन, घरोघरी शिवमूर्तींची प्रतिष्ठापना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी जारी केलेल्या नियमांचे पालन करत बेळगावकरांनी ऐतिहासिक शिवजयंतीच्या प्रथेचे पालन केले. मध्यवर्ती उत्सव मंडळांनी प्रातिनिधिक स्वरुपात केलेले शिवपूजन आणि आवाहनाला प्रतिसाद देत शिवप्रेमींनी घरोघरी केलेली शिवप्रतिष्ठापना हे यावर्षीचे वैशिष्टय़ ठरले. प्रत्येकाने आपल्या मनातील दैवताला मनामनात पूजत यावषीचा उत्सव वेगळय़ा पद्धतीने साजरा केल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले.
कोरोनामुळे यावषीही चित्ररथ मिरवणूक खंडित झाली. मात्र यामुळे नाराज न होता छत्रपती शिवरायांचे विचार पुढे नेण्याचा संकल्प करत शिवजयंतीचा उत्सव साजरा झाला. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाच्यावतीने शहापूर येथील शिवाजी उद्यानातील मूर्तीचे निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन केले. अध्यक्ष दीपक दळवी यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे आदी उपस्थित होते.
शहापूर विभाग मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ
शहापूर विभाग मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी श्रीकांत प्रभू, नितीन जाधव, विजय जाधव, रणजीत हावळण्णाचे, सुमंत जाधव, अशोक चिंडक यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
शिवजयंती चित्ररथ महामंडळ
चित्ररथ महामंडळातर्फे शिवजयंती साजरी झाली. सुनील जाधव यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. शाहूनगर मंडळाचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी श्रीफळ वाढविले. विजय कुंटे यांच्या हस्ते आरती झाली.
वैष्णवी धामणेकर, अंकिता तुळस, प्रमोद कंग्राळकर यांनी शिवरायांची आरती, ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हटला. यानंतर निवडक कार्यकर्त्यांच्या समवेत दाखल होत विविध संघटनांनी शिवमूर्तीचे पूजन केले. यामध्ये मराठी भाषिक युवा आघाडी, म. ए. समिती महिला आघाडी व इतर संघटनांचा समावेश होता.
उत्सव महामंडळे आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर शिवजयंती साजरी केली.