पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची अधिकाऱयांना सूचना : वसतीगृहांमध्ये कोविड सेंटर सुरू करा
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि ग्रामीण भागात स्मशानभूमीसाठी त्वरित जागेची व्यवस्था करावी, सरकारी वसतीगृहांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करा. तसेच सरकारी व खासगी हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या वाढवा, अशा महत्त्वपूर्ण सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱयांना केल्या.
वंटमुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती व प्रसिद्धी खात्याच्यावतीने पत्रकारांना गुरुवारी लस देण्यात आली. याची सुरूवात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सूचना केल्या.
कोरोनामुळे मृत्यू होणाऱयांची संख्या अधिक असून स्मशानभूमीची जागा कमी पडत आहे. यासाठी शहर आणि ग्रामीण भागात पर्यायी जागा उपलब्ध करा, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱयांना केली. तसेच तहसीलदारांतर्फे त्याची त्वरित कार्यवाही होईल याकडे लक्ष द्या, असे ते म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि समुदाय भवनमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्याची सूचना त्यांनी जिल्हा आरोग्याधिकाऱयांना केली.
अथणीसह काही तालुका केंद्रांमध्ये अधिक बेड्सची मागणी होत आहे. त्याची पाहणी करुन अधिक बेड्सची व्यवस्था करावी. मेडिसीनकिट घरोघरी पोहोचवा तसेच ऑक्सिजन लावण्याबाबत डॉक्टर, कर्मचाऱयांना ऑनलाईन प्रशिक्षण द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारी वसतीगृहांमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावेत. जेणेकरुन होम आयसोलेशनबाबत ज्यांना अडचणी आहेत त्यांना तेथे राहता येईल, अशी सूचनाही त्यांनी केली.
रेमडेसिवीरच्या अधिक दराबाबत तक्रारी आल्यास कारवाई करा
रेमडेसिवीरच्या अधिक दराबाबत तक्रारी आल्यास संबंधित डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱयांना केली. तसेच कोणत्याही स्वरुपाचा काळाबाजार उघडकीस आल्यास त्वरित गुन्हा दाखल करा, असेही त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड, रुग्णवाहिका याबाबत चर्चा झाली आहे. त्यांच्या सर्व सूचना गांभीर्याने घ्या, असेही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱयांना सांगितले.
सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या वाढवा. बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने काही ठिकाणी ऑक्सिजन बेड कमी पडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर बेड वाढविण्यासाठी पावले उचला, असे ते म्हणाले. हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या रिक्त बेड्स याची सर्व माहिती नागरिकांना वेबसाईटद्वारे देण्याची महत्त्वपूर्ण सूचना पालकमंत्र्यांनी केली. दुसरा डोस देण्यास विलंब झाला तरी हरकत नाही, असे तज्ञांनी सांगितले आहे. तथापि, सरकार दुसरा डोस देण्यासाठीही प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, पालिका आयुक्त के. जगदीश उपस्थित होते.