शहरात कोयता नाचवून माजवली दहशत, सात संशयित ताब्यात, पोलिसांकडून रात्रभर सर्च ऑपरेशन
प्रतिनिधी/ सातारा
पुणे येथे नुकतीच कोयता गँग सक्रिय असताना सोमवारी रात्री शिवतीर्थ तसेच सातारा शहरात कोयता गँगने दहशत माजवली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सातारकरांना चांगलीच धडकी भरली होती. साडेसात वाजण्याच्या सुमारास पोवईनाका येथील शिवतीर्थ परिसरात दोन दोन दुचाकीवरून कोयता गॅँगचे आलेले सदस्य नागरिकांना अरेरावी करत दहशत माजवली. या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनाही त्यांनी अरेरावी केली. हे पाहून पोलिसांनी त्यांना हटकले. या युवकांनी तिथून पळ काढला. लॉ कॉलेज परिसरात कोयता नाचवत दहशत माजवली जात आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत यादव यांना मिळाली. या ठिकाणी काही वाहनधारकांना गॅगच्या युवकांनी कोयता दाखवून वार करण्याचा प्रयत्न केला. एका चारचाकी वाहनधारकांवर वार करत गाडीची काच फोडली. अवघ्या काही सेंकदात शांत सातारा शहरात कोयता गँगचा थरार अनुभवायला मिळाला. पोलिसानी तत्काळ अॅक्शन मोडमध्ये येऊन धरपकड करत सात संशयितांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत साताऱ्यात चोख बंदोबस्त ठेऊन या गॅगच्या सदस्यांना शोधण्याचे काम सुरू ठेवले होते.
पुणे शहरात कोयत्या गॅगची वाढती दहशत मोडीत काढण्यास पोलिसांकडून सर्वातोपरी प्रयत्न होत आहे. याच धरतीवर आता साताऱ्यात ही गँग सक्रिय झाल्याचे पहायला मिळत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास काही युवक हे हातात कोयते घेऊन फिरत होते. काही राजपथावर तर काही शिवतीर्थावर फिरत होते. अवघ्या काही सेंकदात हातातील हे कोयते नाचवायला सुरूवात झाली. शिवतीर्थ परिसरात वाहतूक पोलीस उभे होते. दोन युवक दुचाकीवरून तिथे आले. त्यांच्या हातात कोयते पाहून नागरिक घाबरले. याचा फायदा घेत युवकांनी अरेरावी करण्यास सुरूवात केली. हे पाहून वाहतूक पोलिसांनी त्यांना हटकवले. असता सर्वांनी पळ काढला. त्याच दरम्यान, राजपथावर काही युवक कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस या युवकांचा शोध घेऊ लागले. पोलिसांना काही कळण्याआधी या युवकांनी लॉ कॉलेज परिसरात एका नेव्ही ऑफिसरच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या गळ्याला कोयता लागल्याने तो जखमी झाला. त्यांच्या गाडीची काच फुटली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ऑफीसर घाबरले. त्यांनी गाडी न थांबता तेथून पळ काढला. संपूर्ण राजपथावर कोयता गँग दहशत माजवत फिरत होती. यामुळे वाहनधारक, नागरिक, विक्रेते यांनी जीव मुठीत घेतला होता.
पोलिसांनी सुरू केली धरपकड
कोयता गँग सक्रीय झाल्याचे कळताच पोलिस दल ही सक्रीय झाले. पीसीआर, डायल 112 तसेच पेट्रोलिंगच्या गाड्या शहरातून फिरू लागल्या. रस्ता दिसेल तिथून संशयितांची धरपकड सुरू झाली. अवघ्या काही वेळात 7 संशयितांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. सर्व संशयित शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयतेही जप्त करण्यात आले.
आणखी 8 जणांचा शोध सुरू
कोयता गॅँगचे 7 सदस्य ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. परंतु एकूण 15 जण शहरात फिरत असल्याची चर्चा सुरू होती. नक्की किती सदस्य असा प्रश्न उपस्थित होत असला तरी पोलिसांनी संशयितांची धरपकड करत रात्री उशिरापर्यंत शोध सुरू ठेवला होता.