वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
विंडीजच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा क्रिकेट संघाच्या फलंदाज सल्लागारपदी माजी कसोटीवीर शिवनरेन चंदरपॉलची नियुक्ती केल्याची घोषणा विंडीज क्रिकेट मंडळाने केली.
जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान होणाऱया 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्व चषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद विंडीज भूषवित आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी विंडीजच्या युवा संघाला सराव शिबिरात अनुभवी चंदरपॉलचे फलंदाजीत मार्गदर्शन लाभणार आहे. सदर माहिती क्रिकेट विंडीजचे संचालक जिमी ऍडॅम्सने दिली.
या स्पर्धेसाठी विंडीज युवा संघाने गेल्या ऑगस्टपासून आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे. या सराव शिबिरात युवा क्रिकेटपटूंना कर्टली ऍम्ब्रोस यांचेही मार्गदर्शन लाभत आहे.
शिवनरेन चंदरपॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत विंडीजतर्फे सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम केला असून त्याने 164 कसोटीत 51.37 धावांच्या सरासरीने 11867 धावा जमविल्या आहेत. आयसीसीसीची 19 वर्षाखालील वयोगटासाठी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 4 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2022 दरम्यान खेळविली जाणार आहे.