वार्ताहर / राजापूर
राजापूर अर्बन बँकेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या सत्ताधारी सहकार पॅनलच्या बैठकीत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिवसेनेला दोन जागा देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र शिवसहकार पॅनलने ही ऑफर धुडकावून लावली आहे.
राजापूर अर्बन बँक निवडणूक शिवसेना शिवसहकार सेनेच्या माध्यमातून स्वबळावर लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार पॅनलकडून दोन जागेची ऑफर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा खुलासा शिवसहकार सेनेचे संपर्क प्रमुख समीर शिरवाडकर यांनी केला आहे. त्यामुळे राजापूर अर्बन बँकेची बिनविरोध होण्याची शक्यता तुर्त मावळली आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या आमदार राजन साळवी, विभागीय शिवसेना नेते, युवासेना आणि शिवसहकार सेनेच्या संयुक्त बैठकीत राजापूर अर्बन बँकेची निवडणूक शिवसेना प्रणित शिवसेनेची अधिकृत संघटना शिवसहकार सेना यांच्यामार्फत स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर शिवसेने आपले काम देखील सुरू केल्याचे शिरवडकर यांनी सांगितले. कोविडमुळे पुढे गेलेल्या अर्बन बँकेच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहे. शिवसेना शिवसहकारने स्वबळाचा नारा देताच, काँगेस आणि राष्ट्रवादीनेसुद्धा स्वबळाचा नारा दिल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. मग आता ऑफर कशाला, असा सवाल उपस्थित करत शिवसहकार सेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा पुररूच्चार त्यांनी केला.