ऑनलाईन टीम / मुंबई :
चेक बाऊन्स प्रकरणात पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित पालघर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. या प्रकरणात कोर्टाने त्यांना एक वर्षाचा तुरूंगवास आणि पावणे दोन कोटींच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोबर 2014 ला गावित यांनी व्यावसायिक चिराग कीर्ती बाफना यांना दीड कोटींचा चेक दिला होता. हा चेक बाऊन्स झाल्याने बाफना यांनी पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दावा दाखल केला होता. या प्रकरणात कोर्टाने गावित यांना एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे. या दंडाला आणि शिक्षेला 14 मार्चपर्यंत न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे.