प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हय़ातील शिवसेनेच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेना लढणार असल्याचे सांगितले.
या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदार संघनिहाय सविस्तर चर्चा करण्यात आली. कच्ची मतदार यादी, उमेदवारांची वर्गवारी याबाबत चर्चेनंतर आपापल्या मतदारसंघात व कार्यक्षेत्रात कशा पध्दतीने निवडणुकीच्या अनुषंगाने काम करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेची जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत अधिकृत घोषणाही लवकरच करण्यात येईल, असे प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या बैठकीस राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रा. नितीन बानगुडे-पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, युवानेते धैर्यशील पाटील, शेखर गोरे, डी. एम. बावळेकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.