पदाधिकाऱयांसह खासदार विनायक राऊतांकडून कामाची पाहणी : दर्जाबाबत तडजोड स्वीकारणार नाही
महामार्ग प्राधिकरण-ठेकेदार कंपनीला दिला इशारा : पदाधिकाऱयांनी याकडे वेधले लक्ष-
कणकवली शहरात ठिकठिकाणी रस्ते खचले : पाण्याचे नैसर्गिक स्त्राsत करण्यात आलेत बंद
चुकीच्या पद्धतीने बांधकामांना परवानगी : या सर्वांमुळे पाणी साचण्याच्या प्रकारांत वाढ
वार्ताहर / कणकवली:
कणकवली शहरात ठिकठिकाणी खचलेले रस्ते व पाण्याचे बंद करण्यात आलेले नैसर्गिक स्त्राsत याबाबत शिवसेना पदाधिकाऱयांनी हायवेचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱयांना घेऊन कामाची पोलखोल केली. खासदार विनायक राऊत यांनी पाहणी करून ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांना तातडीने ही कामे मार्गी लावत असताना कामाच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा दिला. शहरातील हायवेच्या कामात नैसर्गिक पाण्याचे स्त्राsत बंद झाल्याने शहरात पावसात पाणी साचण्याचे प्रकार घडत आहेत. चुकीच्या प्रकारे बांधकामांना परवानगी दिल्याने शहरात भविष्यात जनतेला त्रास सहन करावा लागणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले. त्यावर राऊत यांनी चुकीची परवानगी दिलेल्या बांधकामांची तातडीने चौकशी करा, अशा सूचना दिल्या.
कणकवली शहरातील हायवेच्या समस्यांबाबत राऊत यांनी शुक्रवारी गडनदी पूल ते जानवली पुलापर्यंत सर्व्हिस रस्त्यांच्या दोन्ही बाजूने पाहणी केली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कार्यकारी अभियंता सलीम शेख, उपअभियंता पोवार, शाखा अभियंता गणेश महाजन, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, विलास कोरगावकर, दिलीप बिल्डकॉनचे परिहार, कपिलकुमार शर्मा, कामाची क्वालिटी पाहणाऱया आरटी फॅक्ट कंपनीचे एन. पी. सिंग आदी उपस्थित होते.
काँक्रिटची वॉलच बांधा!
गोकुळधाम हॉटेल समोरील नाल्यात पाणी साचून सारस्वत बँकेपासून अनेकांचे नुकसान झाल्याकडे पारकर यांनी खासदारांचे लक्ष वेधले. त्यावेळी राऊत यांनी पावसाचा जोर कमी झाल्यावर या नाल्याच्या दोन्ही बाजूने मेन होलपर्यंत काँक्रिटची वॉल बांधण्याची सूचना दिली. त्यावर परिहार यांनी मोठे पाईप टाकतो, असे सांगितले. पण मोरीचे पाईप टाकल्यास पुन्हा पाणी साचणार. त्यामुळे पाईप नको, तर वॉलच बांधा, अशी मागणी नाईक, पारकर, सावंत व सुशांत नाईक यांनी केली. सलीम शेख यांनी कंपनीला त्याबाबत सूचना दिल्या.
ती संरक्षक भिंत तात्पुरती!
एस. एम. हायस्कूलसमोर बॉक्सेल ब्रिजचा भाग खचल्यानंतर तेथे बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाबाबत आमदार नाईक यांच्यासह पारकर व सावंत यांनी आक्षेप घेतला. सध्याची काँक्रिट वॉल ही तात्पुरती असून ती नंतर ठेवायची की काढायची, हे नंतर ठरविण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले. स्टेट बँकेसमोर सुनील कोरगावकर यांच्या भू संपादनाची प्रक्रिया अर्धवट असल्याने सर्व्हिस रस्त्याचे काम रखडल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
कामाच्या दर्जात तडजोड नाही!
पटवर्धन चौकात असलेला विलास कोरगावकर यांचा दुकानगाळा पहिल्या लाईन आऊटमध्ये बाधीत होत नव्हता. नंतर हायवेचे सीमांकन लाईन बदलली, असा आरोप कोरगावकर यांनी केला. गांगो मंदिरसमोरील अंडरपासवरील बॉक्सेल ब्रिजवरील खचलेल्या रस्त्याची पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत मला कोणतीही तडजोड चालणार नसल्याचा इशारा राऊत यांनी दिला. या बॉक्सेलवर अजून एक काँक्रिटचा लेअर येणार असल्याचे कपिलकुमार यांनी सांगितले. तसेच चिंतामणी पार्क बिल्डिंगसमोर संरक्षक भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहे. तेथील गटाराचे काम तातडीने मार्गी लावण्याची सूचना राऊत यांनी दिली.
गटारांची कामे निकृष्ट!
हायवेलगत करण्यात आलेल्या गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी गटाराचे बांधकाम तुटलेल्या स्थितीत आहे. ज्या ठिकाणी गटारे बंद झाली, तेथे दुरुस्ती करून गटारांची कामे मजबूत करण्याची मागणी पारकर यांनी केली. वीज वितरणच्या सबस्टेशन बाहेरील खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी केवळ मोरीचे लहान पाईप टाकून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी सर्व्हिस रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत करण्याची मागणी सुशांत नाईक यांनी केली. हे काम तातडीने करण्याची सूचना राऊत यांनी दिली.
‘त्या’ बांधकामाची कागदपत्रे सादर करा!
उबाळे मेडिकल समोरील जुन्या नाल्याच्या ठिकाणी मोठे पाईप घालण्याची गरज असताना लहान पाईपमुळे पाणी साचण्याचा प्रकार घडतो. नुकत्याच झालेल्या पावसात डॉ. तायशेटे हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले होते. यात हॉस्पिटलच्या लॅबसह अनेक साहित्याचे नुकसान झाल्याचा मुद्दा पारकर यांनी मांडला. यावेळी डॉ. संदीप सावंत, व डॉ. धनश्री तायशेटे-सावंत यांनी नाल्याचा मूळ प्रवाह बदलण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राऊत यांनी नाल्यापासून जे बांधकाम सुरू आहे, तेथे नियमानुसार सामासिक अंतर सोडण्यात आले का? तीन मीटर रुंदीचा नाला असताना नाल्यापासून इमारत बांधकाम तीन मीटर अंतरावर केले पाहिजे. प्रत्यक्षात बांधकाम नाल्यालगत करण्यात येत आहे. त्याबाबत न. पं.कडून नाल्याचा मूळ प्रवाह वळविण्यासाठी परवानगी घेण्यात आली का? या बांधकामाला दिलेली परवानगी, प्लानची प्रत, बांधकामाचे कागदपत्र द्या, अशी सूचना केली.