प्रतिनिधी / बेळगाव
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना देशभरात मानाचे स्थान आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात शिवाजी महाराजांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. कर्नाटकातील शिमोगा येथे महाराजांची अश्वारुढ मूर्ती बसविण्यात येणार आहे. बेळगावमधील प्रसिद्ध मूर्तिकार मनोहर पाटील (भांदूर गल्ली) यांनी तयार केलेली 12 फुटी शिवरायांची मूर्ती बुधवारी शिमोग्याला रवाना झाली.
बेळगावमध्ये तयार होणाऱया शिवरायांच्या मूर्तींना महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या ठिकाणी मोठी मागणी आहे. या ठिकाणी उत्कृष्ट मूर्ती तयार केल्या जात असल्याने पहिली पसंती बेळगावला असते. बेळगावमध्ये तयार झालेल्या मूर्ती बेंगळूर, दावणगिरी, कारवार, हुबळी, धारवाड या ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. शिवाजी महाराजांबद्दल कर्नाटकातील क्षत्रिय मराठा समाजात आदराचे स्थान असल्याने दक्षिण कर्नाटकात महाराजांच्या मूर्ती दिसतात.
12 फुटांची अश्वारुढ शिवमूर्ती बुधवारी शिमोग्याला रवाना झाली. 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार होणाऱया शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या मूर्तीची प्रतिष्ठपना करण्यात येणार आहे. सुंदर मूर्ती तयार केल्याबद्दल शिमोग्याच्या शिवप्रेमींनी मूर्तिकार मनोहर पाटील व त्यांचे चिरंजीव विनायक पाटील यांचा सन्मान केला.