आज होणार स्पष्ट, एकूण 13 उमेदवार रिंगणात
प्रतिनिधी /म्हापसा
शिवोली मतदारसंघात एकूण 13 उमेदवार रिंगणात असून शिवोलीवासीय यावेळी शिवोलीतील नागरिकास कौल देणार की शिवोली बाहेरील उमेदवारास स्वीकारतात हे आज स्पष्ट होणार आहे. एकूण 13 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत मात्र दयानंद नार्वेकर (भाजपा), डिलायला लोबो (काँग्रेस), विनोद पालयेकर (अपक्ष), ऍड. विष्णू नाईक (आप), सावियो आल्मेदा (अपक्ष), दत्ताराम पेडणेकर (अपक्ष), पल्लवी दाभोलकर (अपक्ष) यांच्यामध्ये होणार आहे.
शिवोली मतदारसंघात वेर्ला-काणका पंचायत, हणजूण-कायसूव पंचायत, मार्ना शिवोली पंचायत, सडये-शिवोली पंचायत, आसगाव पंचायत व ओशेल पंचायत अशा सहा पंचायतींचा समावेश आहे. या मतदारसंघातून 2017 साली विनोद पालयेकर यांनी भाजपचे दयानंद मांद्रेकर यांचा पराभव करून आमदारपदी विराजमान झाले. यंदा अनेक उमेदवार पक्षाच्या तिकीटावर व अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले.
विनोद पालयेकर बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असून त्यांनी आपले बंधू स्व. उदय पालयेकर यांच्याबरोबर राहून शिवोलीत समाजसेवा करण्यास प्रारंभ केला. त्यांनी मार्ना-शिवोली पंचायतीची 2012 साली निवडणूक लढवून पंच सदस्यपदी निवडून आले. स्व. उदय पालयेकर यांनी शिवोलीत दोनवेळा 2007 व 2012 साली आपले भविष्य आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. मात्र त्यांचे बंधू विनोद पालयेकर यांनी 2017 च्या निवडणुकीत विजयी होऊन व मनोहर पर्रीकर यांच्या पाठिंब्याने मंत्रीही झाले. त्यांनी 10,189 मते मिळवून विजय प्राप्त केला. पंच सदस्य, मंत्री व आमदार अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली. त्यांना यंदा पाडण्यासाठी एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत. शिवोलीतील जनता पुन्हा पालयेकर यांना संधी देईल की नाही हे आज स्पष्ट होणार आहे.
खरी लढत सहा उमेदवारांमध्ये
दयानंद मांद्रेकर (भाजप), डिलायला लोबो (काँग्रेस), लिओ डायस (तृणमूल), चॅरिस्मा फर्नांडिस (शिवसेना), डायना फर्नांडिस (संभाजी ब्रिगेड), गौरेश मांद्रेकर (आरजी), जगन्नाथ गांवकर (जय भारत), ऍड. विष्णू नाईक (आप), सावियो आल्मेदा (अपक्ष), अनिल केरकर (अपक्ष), दत्ताराम पेडणेकर (अपक्ष), पल्लवी दाभोलकर (अपक्ष), विनोद पालयेकर यांनीही आपल्या ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाला पाठ फिरवित अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र खरी लढत सहा उमेदवारांमध्ये आहे. दयानंद मांद्रेकर, डिलायला लोबो, सरपंच सावियो आल्मेदा, विनोद पालयेकर, ऍड. विष्णू नाईक व गौरेश मांद्रेकर यापैकी कोण विजयी होणार हे स्पष्ट होणार आहे.
दयानंद मांद्रेकर म्हणजे एक मनमिळावू व शांत स्वभावाचे व्यक्तिमत्त्व. एका साध्या घरातील हॉटेल व्यवसायातून मंत्रीपदापर्यंत (2017 पर्यंत) पोहोचलेले व्यक्तिमत्त्व. त्यांनी 1999 मध्ये भाजपाच्या तिकीटावरून राजकारणात पाऊल टाकले. त्यांनी काँग्रेसच्या ऍड. चंद्रकांत चोडणकर यांचा पराभव केला. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 2002, 2007 व 2012 च्या निवडणुकीत निवडून येत सलग चारवेळा भाजपच्या तिकीटावर निवडून येण्याचा मान मिळविला आहे. या मतदारसंघात यापूर्वी 1972, 1977, 1980 व नंतर 1994 साली ऍड. चंद्रकांत चोडणकर यांनी चारवेळा मगोच्या तिकीटावर निवडून येण्याचा मान मिळविला होता. तसेच सलग चारवेळा निवडून येण्याचा मान दयानंद मांद्रेकर यांनी प्राप्त केला आहे.
शिवोली मतदारसंघातील दयानंद मांद्रेकरांचा बालेकिल्ला म्हणजे वेर्ला-काणका पंचायत क्षेत्र. मांद्रेकर यांना 2007 साली 7402 मते, उदय पालयेकर (अपक्ष) यांना 5400 मते मिळाली होती. 2012 साली त्यांना 11430 मते मिळाली होती 2017 मध्ये त्यांना 8748 इतकी मते मिळाली होती. 2007 ते 2017 पर्यंतच्या निवडणुकांचा आढावा घेतला असता त्यांच्या मतांत चढ उताराचा फरक दिसून येतो. 2017 साली मांद्रेकर यांचा 1441 मतांनी पराभव झाला होता.