प्रतिनिधी/ बेळगाव
थंडी सुरू झाल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये कोरोनाचा आकडा वाढला आहे. मध्यंतरी केवळ दोन ते तीन जण कोरोना बाधित आढळत होते. मात्र आता दुहेरी आकडा दररोज पुढे येत आहे. त्यामुळे दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.
शुक्रवारी जिल्हय़ामध्ये 18 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात तालुक्मयातील 9 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांमध्ये 7 तर ग्रामीण भागातील दोन जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुन्हा काहीशी भीती निर्माण झाली आहे. कोरोना पूर्णपणे जाणे अवघड झाले आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळत असल्यामुळे कोरोना लसीची जोरदार चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
जानेवारीमध्ये काही कंपन्यांची लस येईल, असे सांगण्यात येत असले तरी त्याबाबत अजून स्पष्ट भूमिका नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा आता जनतेने पूर्वी सारखीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे. शुक्रवारी सांबरा, हलगा येथे रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर शहरातील गणपत गल्ली, टिळकवाडी, महाद्वार रोड यासह इतर परिसरात रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागातर्फे रुग्णांची तपासणी सुरू आहे. शहरामध्ये सर्व व्यवहार सध्या तरी सुरळीत आहेत. याचबरोबर हॉस्पिटल्स रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा साऱयांना मिळाला आहे. तरी देखील प्रत्येकाने कोरोनाबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.