प्रतिनिधी/ सातारा
कोरेगाव तालुक्यातील शेंदूरजणे येथे टाटा सुमो वाहनातून बेकायदेशीरपणे स्फोटकांची वाहतूक करणाऱया एकास अटक करुन वाहनातील तब्बल 1 हजार 600 जिलेटीन कांडय़ा जप्त करण्यात आल्या. सातारच्या दहशतवाद विरोधी कक्षाने केलेली ही मोठी कारवाई असून पोलिसांनी जिलेटीन कांडय़ा व टाटा सुमो जीपसह 2 लाख 17 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 9 रोजी दहशतवाद विरोधी कक्षातील अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना स्फोटकांची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या पथकाने तातडीने शेंदूरजणे (ता. कोरेगाव) येथे सापळा रचला. त्यावेळी चालक संतोष हिंदूराव पवार (वय 38, रा. धावडशी, ता. सातारा) हा चालक टाटा सुमोसह आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व गाडीची तपासणी केली.
यावेळी गाडीत एक हजार 600 जिलेटीन कांडय़ा आढळून आल्या. चालक पवार याच्याकडे विचारण केली असता त्याच्याकडे जिलेटीन कांडय़ा वाहतुकीचा परवाना, माल खरेदीच्या पावत्या नव्हता. वाहनाची कागदपत्रे देखील नव्हती. त्याने सदरच्या 200 किलो वजनाच्या जिलेटीन कांडय़ा शेरखान अल्लाबेली मन्सुरी (रा. सातारा) यांनी वाहतूक करण्यास सांगितले असल्याचे कबूल केले. या जिलेटीन कांडय़ांवरील बॅच क्रमांक, उत्पादन तारीख, कोड काढून टाकण्यात आले होते.
हा प्रकार संशयास्पद असल्याने दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने चालक पवार यास अटक करुन कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून कोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्षचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंके, सहाय्यक पोलीस हवालदार हणमंत भोसले, पोलीस नाईक सागर भोसले, कॉन्स्टेबल सुमीत मोरे यांनी सहभाग घेतला. या पथकाचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
चौकट
आता पोलिसांची शेरखानवर नजर
ज्या टाटा सुमो गाडीतून प्रचंड प्रमाणावरील हे स्फोटक वाहतूक होत होती ती साताऱयातील शेरखान मन्सुरी याच्या सांगण्यावरुन होत असल्याचे निष्पन्न झालेय. मात्र, अद्याप शेरखान हा पोलिसांच्या जाळय़ात आलेला नाही. 21 वर्षांपूर्वी साताऱयातील संगमनगर परिसरात जिलेटीन साठय़ाचा मोठा स्फोट झाला होता. आज देखील त्या आठवणीने अंगावर शहारा येतो. असा साठा बाळगणारा हा शेरखान मन्सुरी नेमका कोण ? हे शोधण्यासाठी पोलिसांची नजर शेरखानला शोधत आहे.