सेन्सेक्समध्ये 85 अंकांची वाढ, अल्ट्राटेक, मारूती सुझुकी नफ्यात
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरूवात कमकुवत झाली तरी नंतर बाजार सावरत तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला. अल्ट्राटेक सिमेंट, महिंद्रा आणि महिंद्रा तसेच मारूती सुझुकीचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.
सोमवारी सरतेशेवटी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 85 अंकांच्या वाढीसह 61308.91 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 52 अंकांच्या वाढीसह 18,308 अंकांवर बंद झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसईवर 30 पैकी 19 समभाग तेजीसह तर 11 समभाग घसरणीसह बंद झाले. यातही एचसीएल टेकचे समभाग सर्वाधिक 6 टक्के इतके घसरलेले पाहायला मिळाले.
बीएसईवर अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग 2.78 टक्के इतका वाढलेला दिसला. त्यापाठोपाठ महिंद्रा आणि महिंद्रा आणि मारूती सुझुकीचे समभाग प्रत्येकी 2 टक्के इतके वाढले होते. याखेरीज टाटा स्टील, टीसीएस, एलटी, एसबीआय, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, विप्रो, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, रिलायन्स, एशियन पेंटस्, बजाज फायनान्स, टायटन आणि इंडसइंड बँक यांचे समभाग तेजी दर्शवत होते. एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा, सन फार्मा, पॉवरग्रिड कॉर्प, नेस्ले इंडिया, एचडीएफसी, डॉ. रेड्डिज लॅब्ज, कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले. एनएसईवर हिरो मोटो कॉर्प, ग्रेसीम, ओएनजीसी, टाटा मोटर्स आणि अल्ट्रासिमेंट यांचे समभाग तेजीत होते तर एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, सिप्ला, ऍक्सिस बँक आणि ब्रिटानिया यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले. हिरो मोटोकॉर्पने अलीकडेच ऍथर एनर्जीमध्ये 420 कोटी रुपये गुंतवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हा समभाग चढल्याचे दिसले. क्षेत्राच्या निर्देशांकाचा विचार करता ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक 1.41 टक्के तेजीत होता. रियल्टी निर्देशांक 1.37 टक्के तेजीत होता तर सोबत धातू, टेलिकॉम क्षेत्राचा निर्देशांकही तेजी राखून होता. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल पहिल्यांदाच 280 लाख कोटीवर पोहचले आहे.