सेन्सेक्सची 355 अंकांची उसळी : निफ्टीने ओलांडला 11,900 चा टप्पा
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील सलग तिसऱया दिवशी बुधवारी भारतीय शेअर बाजारात तेजीचा कल राहिला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली असून निवडणुकीनंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे देशासह आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये काहीसा विश्वास प्राप्त होत असल्याने बाजारांमध्ये सलगची तेजी पहावयास मिळत असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्सने 355 अंकांची मजबूती प्राप्त केली आहे. जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि कोटक बँक यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.
चढ-उताराच्या प्रवासात सुरु असलेला भांडवली बाजार दिवसअखेर 355.01 टक्क्यांनी वधारुन निर्देशांक 40,616.14 वर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 95.00 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 11,908.50 वर स्थिरावला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सोबत सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, कोटक बँक आणि टेक महिंद्राने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी, पॉवरग्रिड कॉर्प, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी आणि लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
अमेरिकेतील निवडणुकीचा प्रभाव
देशातील भांडवली बाजारात जागतिक पातळीवरील घडामोडींचा प्रभाव नेहमीच परिणामकारक दिसून येतो. यात बुधवारी अमेरिकन निवडणुकीच्या निकालाआधी जगातील बाजार उत्साहात राहिले होते. डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडन यांच्यात काटेकी टक्कर पहावयास मिळाली आहे. आशियातील अन्य बाजारात शांघाय, सोल आणि टोकीयो हे लाभासह बंद झाले आहेत. हाँगकाँगचा बाजार नुकसानीत राहिला. युरोपातील प्रमुख बाजारात प्रारंभी तेजीचा कल राहिला होता.