सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला
प्रतिनिधी/ कराड
राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयातील दालन क्रमांक 241 मध्ये बुधवारी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करणारे बाळासाहेब पाटील यांना सहकार व पणनमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संधी दिली आहे. 30 डिसेंबर रोजी बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. बुधवारी मंत्रालयात त्यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला.
सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आमदार भारत भालके, आमदार संग्राम थोपटे, आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर, सेवानिवृत उपायुक्त तानाजी साळुंखे, माजी सहकार न्यायाधीश ऍड. अशोक पवार, आश्रमशाळा संचालक किरण शिंदे उपस्थित होते.
मंत्री बाळासाहेब पाटील यावेळी म्हणाले, शरद पवार यांच्या विचारांची पाठराखण करत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय पी. डी. पाटील यांच्या विचारांनुसार सहकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करून काम करीत आहोत. याची दखल घेऊन शरद पवार यांनी राज्यस्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील सहकार चळवळ अधिक सक्षम करण्याचा आपला प्रयत्न राहील. सहकार क्षेत्रातील तज्ञांशी विविध प्रसंगी चर्चा केली जाईल. शेतकऱयांना न्याय देण्याची भूमिका नेहमी राहील. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या शेतकयांना न्याय देण्याची नेहमीच माझी भूमिका राहिली आहे. आता राज्यातील ऊस उत्पादक आणि शेतकरी बांधवांना न्याय देण्याची प्राथमिकता असेल.