आयसीसी टी-20 क्रमवारीत बेथ मुनीवर 35 गुणांची आघाडी
वृत्तसंस्था/ दुबई
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात 30 चेंडूत 60 धावा झोडपणाऱया भारताच्या शेफाली वर्माने आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या महिलांच्या टी-20 मानांकनात आपले अग्रस्थान आणखी भक्कम केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीवर तिने 35 गुणांची आघाडी घेतली आहे.
शेफालीने गेल्याच आठवडय़ात या क्रमवारीतील अग्रस्थान पुन्हा हस्तगत केले होते. शेवटच्या सामन्यातील 60 धावांच्या तडाखेबंद खेळीमुळे तिने 26 मानांकन गुणांची कमाई केली असून तिचे आता 776 गुण झाले आहेत. तिची जवळची प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी दुसऱया क्रमांकावर असून ती शेफालीपेक्षा 35 गुणांनी मागे आहे. वर्माची सलामीची जोडीदार स्मृती मानधनाने एका स्थानाची प्रगती करीत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. तिने शेवटच्या सामन्यात शेफालीसमवेत 96 धावांची भागीदारी करताना 28 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावल्या होत्या. गोलंदाजांच्या क्रमवारीत डावखुरी स्पिनर राजेश्वरी गायकवाडने या सामन्यात भेदक मारा करीत 9 धावात 3 बळी मिळविले होते. या कामगिरीने तिने 12 स्थानांची प्रगती करीत 13 व्या स्थानावर मजल मारली आहे. आजवरचे तिचे हे सर्वोच्च मानांकन आहे. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीनेही 15 स्थानांची प्रगती करीत 56 वे स्थान मिळविले आहे.
दक्षिण आफ्रिका महिलांनी ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यांची कर्णधार सुने लुसने एका स्थानाची बढती मिळवित 37 वे स्थान मिळविले आहे तर वेगवान गोलंदाज तुमी सेखुखुने हिने सात स्थानांची मजल मारीत 42 वे स्थान पटकावले आहे. अष्टपैलू नादिन डी क्लर्कने दोन स्थानांची प्रगती करीत आपल्याच देशाच्या मोसेलिन डॅनियल्ससह संयुक्त 66 वे स्थान मिळविले आहे. अन्य खेळाडूंत ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ऍश्ले गार्डनरने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 73 धावांची खेळी केल्याने तिला पाच स्थानांची बढती मिळाली असून ती आता 11 व्या स्थानावर पोहोचली आहे. त्यांची लेगस्पिनर जॉर्जिया वेअरहॅमनेही दोन स्थानांची बढती मिळवित 10 व्या स्थानावर पोहोचली आहे तर निकोला कॅरेने 60 वरून 57 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
न्यूझीलंडची माजी कर्णधार ऍमी सॅटर्थवेटने 40 धावांची खेळी करीत एका स्थानाची बढती मिळविली. ती आता 27 व्या स्थानावर आहे. अष्टपैलू अमेलिया केरने फलंदाजीत 10 स्थानांची प्रगती करीत 71 वे तर मॅडी ग्रीनने तीन स्थानांची प्रगती करीत 87 वे स्थान मिळविले आहे. रोजमेरी मायर (7 स्थानांची बढती, 46 वे स्थान), जेस केर (38 स्थानांची प्रगती, 92 वे स्थान) यांनीही क्रमवारीत बढती मिळविली आहे.