प्रतिनिधी / मडगाव :
ताळगांव येथील 66 वर्षीय व्यक्तीचा कोविड संसर्गामुळे मंगळवारी रात्री बळी गेला होता. या व्यक्तीवर काल गुरूवारी सातइनेज-पणजी येथे अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, त्याला 108च्या शववाहिकेने खो घातला. त्यामुळे मडगाव हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मडगाव हॉस्पिसियो इस्पितळाचे शवचिकित्सक डॉ. मधु घोडकीरेकर उपस्थित होते.
108च्या कर्मचाऱयांच्या मागण्या सरकार दरबारी पडून आहेत. या मागण्यावर सरकारकडून विचारविनिमय होत नसल्याने त्याचा निषेध म्हणून काल मयत व्यक्तीचा मृतदेह शेवटच्या क्षणी पणजीला नेण्यास नकार दर्शविंला. 108चे कर्मचारी सहकार्य करीत नसल्याचे पाहून मृतदेहावर मडगाव हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. गेल्या दोन दिवसांमागेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक यांनी मडगाव हिंदू स्मशानभूमी कोविडमुळे मृत्यू आल्यास वापरण्यास मान्यता दिली होती. काल या स्मशानभूमीचा त्यासाठी प्रत्यक्षात वापर सुरू झाला.
पणजी महानगरपालिकेच्या सांतइनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मान्यता मिळाली होती व तशी तयारी देखील करण्यात आली होती. मयत व्यक्ती ताळगांव येथील असल्याने पणजीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मयताच्या मुलाने वडिलावर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, शेवटच्या क्षणी 108 ने मृतदेह पणजीत नेण्यास नकार दर्शविल्याने मडगावात अंत्यसंस्कार करावे लागले. यावेळी मयताचा मुलगा अनिरूद्ध व त्याची बहिण स्मशानभूमीत उपस्थित होते. त्यांनी आपल्या वडिलांना शेवटचा निरोप दिला.
काल मडगाव स्मशानभूमीत दोन स्थानिकावर अंत्यसंस्कार करायच होते. त्यामुळे थोडासा विलंब झाला व संध्याकाळच्या सत्रात कोविडमुळे मृत्यू आलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.