प्रतिनिधी/ बेंगळूर
यंदा 1 जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष प्रारंभ करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असून शैक्षणिक पूर्वतयारीला 15 जूनपासून प्रारंभ करण्याची सूचना मुख्याध्यापक, शिक्षकांना देण्यात आली आहे. याच दरम्यान प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यास सांगितले असून शिक्षकांना शाळांमध्ये हजर होण्याची आदेशपत्रकाद्वारे सूचना करण्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्ग अद्याप कमी न झाल्याने लॉकडाऊन असणाऱया बेळगावसह 11 जिल्हय़ांमधील शिक्षकांना शाळेत हजर होण्यापासून सूट देण्यात आली असली तरी वर्क फ्रॉम होमची सूचना देण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरच शाळांमध्ये हजर राहता येईल, असे शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी सांगितले आहे.
सार्वजनिक शिक्षण खात्याचे आयुक्त अन्बुकुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना सुधारित आदेश पाठवून 1 जुलैपासून नवे शैक्षणिक वर्ष प्रारंभ होणार आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील मुख्याद्यापक आणि शिक्षकांनी मंगळवार दि. 15 जूनपासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया आणि शैक्षणिक पूर्वतयारी करावी अशी सूचना दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 जूनपर्यंत लॉकडाऊन जारी करणाऱया आलेल्या बेळगाव, चिक्कमंगळूर, शिमोगा, दावणगेरे, म्हैसूर, चामराजनगर, हासन, मंगळूर, बेळगाव (चिकोडी शैक्षणिक जिल्हय़ासह), बेंगळूर ग्रामीण, मंडय़ा आणि कोडगू जिल्हय़ांमधील शिक्षकांनी निर्बंध शिथिल होत नाहीत तोपर्यंत घरात राहूनच नव्या शैक्षणिक वर्षाच्या पूर्वतयारीची कामे करावीत, अशी सूचना शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी दिली आहे.
राज्यातील 19 जिल्हय़ांमध्ये सोमवारपासून अनलॉक जारी करण्यात आला आहे. मात्र, बेंगळूरसह सर्व जिल्हय़ांमध्ये बससेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे शाळेपर्यंत येण्यासाठी शिक्षकांना गैरसोयींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. अनलॉक असणाऱया जिल्हय़ांमधील शिक्षकांना शाळेत येण्यासाठी स्वतःचे वाहन, ऑटोरिक्षा, टॅक्सीचा वापर करावा लागणार आहे.