दाक्षिणात्य स्टार पुन्हा चर्चेत
दक्षिणेतील दिग्गज अभिनेता नागा चैतन्य हा समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यावर पुन्हा एकदा बॅचलर झाला आहे. चैतन्य आता पुन्हा प्रेमात पडला असल्याची चर्चा आहे. मेड इन हेवन या सीरिजमधील अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत तो वारंवार दिसून येत आहे. नागा आणि शोभिता यांना एकत्र पाहिले गेल्यावर दोघेही परस्परांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.
नागा चैतन्यने अलिकडेच हैदराबादमध्ये जुबली हिल्स येथे एक नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. चैतन्य आणि शोभिता यांना याच नव्या घरात एकत्र पाहिले गेले आहे. चैतन्यसोबत शोभिता याचबरोबर अनेकदा एका हॉटेलमध्ये दिसून आली आहे. शोभिताने अलिकडेच स्वतःचा जन्मदिन हैदराबादमध्येच साजरा केला होता.
समांथा आणि नागा चैतन्य यांनी 6 ऑक्टोबर 2017 रोजी विवाह केला होता. विवाहाच्या 4 वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला होता. समांथा ही दक्षिणेतील सर्वात प्रभावी अभिनेत्री मानली जाते. याचबरोबर देशभरात तिचा आता मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तर नागा चैतन्य लवकरच लालसिंह चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.