जम्मू-काश्मीर / ऑनलाईन टीम
नौगाम परिसरातील अरीबागमध्ये राहणाऱ्या भाजप नेते अनवर खान यांच्या घरी दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरीबागमध्ये राहणारे भाजप नेते अनवर खान यांच्या घरावर दहशतवाद्यांनी अचनाक हल्ला केला. घराबाहेरील गार्ड पोस्टवरील पोलीस कर्मचारी रमीज राजा गंभीर जखमी झाले. हल्ला झाला त्यावेळी भाजप नेते अनवर खान घरात उपस्थित नव्हते. दहशतवादी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करुन त्याची रायफल घेऊन पळाले. गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्या पोलीस कर्मचाऱ्याचा जीव गेला.
याआधी जम्मू-काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोर भागातील नगरपालिसा कार्यालयावर सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी फायरिंग केली होती. या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आणखी एकाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.