वृत्तसंस्था/ अबु धाबी
भारताचा स्टार जलतरणपटू श्रीहरी नटराजने येथे सुरू असलेल्या फिना शॉर्ट कोर्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विक्रम मोडण्याची मालिका पुढे चालू ठेवत त्याने तिसरी ‘सर्वोत्तम भारतीय वेळ’ नोंदवली.
20 वर्षीय नटराजने पुरुषांच्या 100 मी. फ्रीस्टाईलमध्ये 48.65 सेकंद वेळ नोंदवत साजन प्रकाशने नोंदवलेली सर्वोत्तम भारतीय वेळ मागे टाकली. मात्र त्याची ही कामगिरी उपांत्य फेरी गाठून देण्यास पुरेशी ठरली नाही. त्याने हीट्समध्ये 38 वे स्थान मिळविले. पहिले 16 क्रमांक मिळविणाऱया जलतरणपटूंनाच उपांत्य फेरीत स्थान दिले जाते. नटराजने येथील स्पर्धेत 50 मी., 100 मी. बॅकस्ट्रोकमध्ये गेल्या आठवडय़ात सर्वोत्तम भारतीय वेळ नोंदवली होती. पुरुषांच्या 1500 मी. फ्रीस्टाईलमध्ये दिल्लीच्या कुशाग्र रावतने 15ः07.86 से. वेळ नोंदवत हीट्समध्ये 21 वे स्थान मिळविले. शॉर्ट कोर्स जलतरणमध्ये 25 मी. स्विमिंग पूल असतो तर लाँग कोर्समध्ये 50 मी. पूल वापरण्यात येतो. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत नोंदवलेल्या वेळेला राष्ट्रीय विक्रम मानण्यात येते. याशिवाय अन्य स्पर्धांत नोंदवलेल्या वेळेला सर्वोत्तम भारतीय वेळ म्हटले जाते.