देवस्थानात होणार फक्त धार्मिक विधी
प्रतिनिधी/ मडगाव
संपूर्ण गोव्यात तसेच शेजारील कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेला मडगावच्या श्री हरिमंदिर देवस्थानच्या देवस्थानचा दिंडी उत्सवाला आज रविवार दि. 22 पासून प्रारंभ होत आहे. यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा दिंडी महोत्सवातील सर्व प्रमुख कार्यक्रम रद्द करण्यात आले असून देवस्थानात केवळ धार्मिक विधीच होणार आहेत.
आज रविवारी सकाळी 9.30 वा. श्री हरिमंदिरात धार्मिक विधींना प्रारंभ होणार असून शनिवार दि. 28 नोव्हेंबरपर्यंत हे धार्मिक विधी चालू राहणार असल्याची माहिती देवस्थानचे सचिव मनोहर बोरकर यांनी दिली आहे. या काळात श्रींच्या दर्शनाची व्यवस्था देवस्थान समितीतर्फे केली जाणार आहे. परंतु, भाविकांनी देवस्थान गर्दी न करता श्रींचे दर्शन घ्यावे, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
शनिवार दि. 28 नोव्हेंबर हा दिंडी उत्सवाचा मुख्य दिवस होता. मात्र, यंदा नामवंत गायक कलाकारांच्या मैफली तसेच श्रींची पालखी मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे 110 वर्षानंतर यंदा दिंडी महोत्सवात खंड पडलेला आहे. पण, वर्षपद्धतीप्रमाणे, या दिवशी देवस्थानातील सर्व धार्मिक विधी होतील. याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.