अमेरिकेसह अनेक देशांचे सहकार्य- वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन पुरविणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या दुसऱया लाटेने हैराण झालेल्या भारताला मदत करण्याची तयारी विदेशातील अनेक देशांनी केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यासारख्या अनेक देशांनी वैद्यकीय साहित्य, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेड्स, इंजेक्शन्स, औषधनिर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल पुरविण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच काही नामवंतांनी आर्थिक मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे. विदेशातून मिळणाऱया या मदतीचा लाभ अर्थव्यवस्था तारण्यासाठी आणि कोरोनाच्या विळख्यातून सावरण्यासाठी होऊ शकतो.
औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालावरील निर्बंध हटविण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांनी ट्विटरवर भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असून कोरोना उदेकानंतर भारताला आवश्यक ती सर्व मदत आम्ही देऊ असे म्हटले आहे. तसेच ब्रिटननेही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत असल्याचे सांगत शक्मय ती सर्व मदत करण्याचे आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिले आहे. सौदी अरेबिया, सिंगापूरने ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली असून ऑस्ट्रेलियानेही मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्स, युरोप, चीन, पाकिस्तान या देशांनीही भारताला मदत करण्याचे धोरण जाहीर केले आहे. भारतामध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्मय ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिल्यामुळे भारताला कोरोनाविरोधातील युद्ध लढण्यासाठी मदत मिळू शकेल, असा सूर जागतिक पटलावर उमटू लागला आहे.
भारतात गेल्या चार दिवसांत दैनंदिन रुग्णवाढ ही जगभरात सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचे हकनाक बळी जात आहेत. देशात रेमडेसिविर आणि लसीच्या मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेल्या तुटवडय़ामुळे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याचीच दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्यामुळे अनेक देशांसह काही जागतिक संस्था-संघटना आणि बडय़ा कंपन्या भारताच्या सहकार्यासाठी धावून आल्या आहेत.
कच्चा माल पुरवठय़ावरील निर्बंध अमेरिकेकडून मागे
मागील अनेक आठवडय़ांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणाऱया कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणाऱया अमेरिकेनेही भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. भारताचे एनएसए अजित डोवाल आणि अमेरिकेचे एनएसए जेक सुलिवन यांच्यातील चर्चा यशस्वी ठरली आहे. कोरोना लस बनवण्यासाठी कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदीची भूमिका अमेरिकेने मागे घेतली आहे. कोरोना संकटात ज्याप्रकारे भारताने मदत केली, तशीच मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी दिले आहे.
युरोपीय राष्ट्रांसह शत्रूदेशांचाही पुढाकार
भारताला मदत करणाऱया देशांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून शत्रुत्व निभावणाऱया चीन आणि पाकिस्तानचादेखील समावेश आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी, या लढय़ामध्ये फ्रान्स तुमच्यासोबत आहे. असे ट्विट केले आहे. तर युरोपियन परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मायकेल यांनी, युरोपियन संघ भारतासोबत या लढय़ामध्ये उभा असून 8 मे रोजी होणाऱया भारत-युरेप परिषदेत आम्ही चर्चा करू, असे म्हटले आहे.
..