18 वर्षावरील नागरिकांना 1 मे पासून लस
प्रतिनिधी/ बेंगळूर
येत्या 1 मे पासून देशभरात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसी देण्यास प्रारंभ होणार आहे. अलिकडेच 11 राज्यांनी मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. या पाठोपाठ कर्नाटकातही 18 वर्षांवरील नागरिकांना सरकारी इस्पितळांमध्ये मोफत लस देण्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली. गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
अलिकडेच उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, मध्यप्रदेश, ओडिसा, केरळ, गोवा, झारखंड या राज्यांनी 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली होती. मात्र कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मोफत लसीकरणाबाबत कोणतीही वाच्यता केली नाही. त्यामुळे राज्यात मोफत लस मिळणार का? याविषयी नागरिकांमध्ये संदिग्धता होती. दरम्यान सत्ताधारी भाजप पक्षातूनच दबाव वाढल्याने अखेर सोमवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 मे पासून लसीकरण होणार असून त्यासाठी 28 एप्रिलपासून को-विन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. सरकारी इस्पितळांमध्ये मोफत तर खासगी इस्पितळांमध्ये पैसे देऊन लस घेता येईल.
कोरोनामुळे लोक अर्थिकदृष्टय़ा अडचणीत आहेत. गरिबांना पैसे देऊन लस घेणे शक्य होणार नाही. परिणामी लसीकरण मोहिमेचे उद्दिष्ट पार करणे कठीण होईल, असा सल्ला सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारला दिला होता. आधीच राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर, रुग्णवाहिका आणि आयसीयु बेडची कमतरता असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकार विरोधात जनतेमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्थिक संकटातही सरकारने राज्यातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.