सदानंद चव्हाण /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावचे ग्रामदैवत श्री मसणाई देवीच्या यात्रेनिमित्त श्री बाल हनुमान तालीम मंडळ कुस्ती संघटना व ग्रामस्थ यांच्यावतीने रविवारी मार्कंडेय नदी काठावर आयोजिलेल्या कुस्ती आखाडय़ात कर्नाटक केसरी संगमेश बिराजदारने महाराष्ट्र केसरी उमेश चव्हाणला आठव्या मिनिटाला एकचाकी डावावर चीतपट करून उपस्थिती कुस्ती शौकिनांना खूष केले. या मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीतील विजयी पैलवानाला कंग्राळीखुर्द ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेली चांदीची गदा संगमेश बिराजदारने पटकाविली.
या कुस्ती मैदानात संगमेश बिराजदार आणि उमेश चव्हाण यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती आर.आय.पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, मल्ल कृष्णा पाटील, अनंत निलजकर, अनिल पावशे, दत्ता पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते रात्री 8.25 वाजता लावण्यात आली. या लढतीमध्ये सुरूवातीला काही वेळ दोन्ही मल्लांनी परस्परांची ताकद आजमावण्यात वेळ घालविला. सहाव्या मिनिटाला संगमेशने एकेरी पट काढून उमेश चव्हाणवर ताबा मिळविला. आठव्या मिनिटाला एकचाकी डावावर संगमेशने उमेश चव्हाणला चीतपट केले. या कुस्तीसाठी मैदानात ऑलिंपिकपटू मल्ल एम.आर. पाटील व एन.आय.एस. प्रशिक्षक प्रशांत पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.
या मैदानात दुसऱया क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार बेनके लहानकंग्राळी व शाहू आखाडय़ाचा मल्ल सचिन माने यांच्यात झाली. या कुस्तीमध्ये बेनकेने पाचव्या मिनिटाला सचिन मानेला एकलांगी डावावर चीतपट केले. रोहित पाटील कंग्राळी खुर्द आणि शाहु आखाडा कोल्हापूरचा मल्ल साहेब शेख यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. संकल्प येवले आणि महादेव दऱयान्नावर यांच्यातील लढतही बरोबरीत राहिली. अन्य एका लढतीत कंग्राळीखुर्दचा मल्ल पेम जाधवने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर पहिल्याच मिनिटाला विजय मिळविला. या मैदानामध्ये इतर लहान मल्लांच्या लढतीमध्ये कंग्राळीखुर्दचा सुशांत मुतगेकर तसेच कग्राळीखुर्दचा ओम, कंग्राळीखुर्दचा शुभम, रूपेश कर्ले, उर्त्कष बोडकेनट्टी, यशपाल शर्मा, निखिल पाटील, लक्ष्मण कणबर्गी, सिद्धार्थ कुरीहाळ, राम क्रंगाळीखुर्द, यल्लाप्पा कडोली, ओंकार मच्छे, श्रनिवास कडोली, रोहन कडोली, सौरभ सुतार, राजू कडोली, लखन मुतगेकर, स्वप्नील सांवगाव, सुरेश कडोली, ओंकार मुतगा, ज्ञानेश्वर दळवी तुर्केवाडी, यश कोरेगल्ली, तेजस रणकुंडये, प्रज्वल मच्छे या मल्लांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
या कुस्ती आखाडय़ाचे प्रारंभी कल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पंडित पाटील, सागर पाटील यांच्या हस्ते श्री हनुमान फोटो पूजन करण्यात आले. स्वागताध्यक्ष वाय.आर.पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामपंचायत अध्य़क्ष यल्लाप्पा पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन केले.
मुलींच्या कुस्त्यांचे उद्घाटन माजी अध्यक्ष ग्रामपंचायत अध्यक्षा रूक्मिणी निलजकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभीच्या पहिल्या कुस्तीचे उद्घाटन दीपक पाटील यांच्याहस्ते तर आखाडय़ाचे फीत कापून आर.आय.पाटील यांनी उद्घाटन केले.
महिलांच्या कुस्त्यांना चांगला प्रतिसाद
महिलांच्या विभागातील पूजा दळवी आणि सोनी कंग्राळीखुर्द यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती रूक्मिणी निलजकर, प्रेमा जाधव यांच्याहस्ते लावण्यात आली. साक्षी आणि गौतमी कंग्राळी खुर्द यांच्यात दुसऱया क्रमांकाची कुस्ती आयोजित केली होती. महिलांच्या गटातील या दोन्ही लढती बरोबरीत सोडविण्यात आल्या.
कंग्राळीखुर्दचे पार्थ पाटील, प्रथमेश हट्टीकर आणि प्रेम जाधव या तीन मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवीत बक्षिसादाखल ठेवण्यात आलेल्या तीन मेंढय़ा जिंकल्या.
या कुस्ती आखाडय़ाचे औचित्य साधून कंग्राळीखुर्दचे एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक प्रशांत मधु पाटील, महिला मल्ल स्मिता भावकाण्णा पाटील तसेच विधान परिषद सदस्य चरणराज हट्टीहोळी या मान्यवरांचा कुस्ती संघटना व ग्रामस्थांच्यावतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सदर कुस्ती आखाडा यशस्वी करण्यासाठी बाल हनुमान तालीम मंडळ व कुस्तीगीर संघटनेचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे कुस्ती समालोचन पी.वाय.पाटील, टी.डी.पाटील व प्रशांत पाटील यांनी केले.