प्रतिनिधी / कोल्हापूर
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नातू आप्पासाहेब मारूतराव शिंदे (वय 85, रा. जवाहर नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, चार मुली, जावई, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. सांगलीत काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर शिंदे यांनी अर्थमुव्हिंग आणि बांधकाम व्यावसायही सांभाळला. प्रा. अशोकराव रावराणे यांच्याबरोबर शाहू सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यही केले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रसार केला.
चित्रपटांविषयी त्यांचा मोठा अभ्यास होता. बॉलीवूडमधील अभिनेते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या घराण्याशी शिंदे यांच्या जिव्हाळ्याचे संबंध होते. वृद्धापकाळात त्यांनी राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून कार्य सुरू ठेवले होते. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्यावरील कलाजीवनावरील पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले होते. सेवानिवृत्त पुणे विभागीय आयुक्त मोहनराव शिंदे यांचे ते कनिष्ठ बंधू तर श्री क्लिनिकचे डॉ. श्रीकांत शिंदे यांचे ते चुलते होत.