वृत्तसंस्था/ चेन्नई
यावर्षी होणारे फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाड 13 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार असल्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनने (फिडे) घोषित केले.
मागील वर्षी आयोजित करण्यात आलेली पहिली बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा भारत व रशिया यांनी संयुक्तपणे जिंकली. गेल्या वर्षी अवलंबण्यात आलेल्या फॉरमॅटप्रमाणेच यावेळची स्पर्धाही घेतली जाणार असल्याचे फिडेने स्पष्ट केले. यात सदस्य देशांच्या वरिष्ठ व कनिष्ठ गटातील अव्वल खेळाडूंचा समावेश असणार आहे. प्रत्येक संघ रॅपिड सामने सहा पटावर खेळणार आहेत. गेल्या वर्षी चेस डॉट कॉमने त्याचे आयोजन केले होते. यावेळीही त्यांच्याकडेच या स्पर्धेचे यजमानपद असेल. ‘गेल्या वर्षी महामारीच्या काळात या स्पर्धेचे आयोजन हे हायलाईट ठरले होते. यामुळे बुद्धिबळ जगताला या अडचणीच्या काळात एकत्र राहता आले होते. 153 देशांच्या राष्ट्रीय संघांतील 1500 हून अधिक स्पर्धकांनी त्यात भाग घेतला होता,’ असे फिडेने सांगितले.
या दुसऱया आवृत्तीचे शेन्झेन हे प्रायोजक असून रशियाचे ऑनलाईन व्होलसेल स्टोअर सिमालँड हेही या स्पर्धेचे सहपुरस्कर्ते असतील. सिमालँड हेच कँडिडेट्स स्पर्धेचे पुरस्कर्ते होते. यावेळी होणाऱया ऑलिम्पियाडमध्ये दोन टप्पे राहणार असून डिव्हिजन्स व प्लेऑफ असे हे टप्पे असतील. स्टेज वनमधील अव्वल आठ संघ बाद फेरीत खेळणार असून पात्रता फेरीला 13 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. टॉप डिव्हिजन टप्पा 8 सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्यात 25 अव्वल मानांकित आणि 15 पात्र ठरलेल्या संघांचा समावेश असेल. निर्णायक प्लेऑफ टप्पा 13 ते 15 सप्टेंबर या कालावधीत होईल. स्पर्धेत सहभागी होणाऱया संघात सहा खेळाडू असतील. त्यात किमान दोन महिला व किमान एक 20 वर्षाखालील वयोगटाचा मुलगा व एक मुलगी असणे आवश्यक असेल. 15 मिनिटांचा प्रत्येक सामना होणार असून प्रत्येक चालीनंतर 5 सेकंदाचा वाढीव वेळ मिळणार आहे.