प्रतिनिधी /बेळगाव
संगीत कलाकार संघाची सप्टेंबर महिन्याची बैठक मंगळवार दि. 27 रोजी सायंकाळी 5.30 वाजता शहापूरच्या सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात समीरा मोडक आणि रोहिणी कुलकर्णी यांचे गायन होईल.
समीरा मोडक यांनी प्रभावती वामनाचार्य यांच्याकडे प्रारंभिक शिक्षण घेतले. त्यानंतर मुकुंद गोरे आणि कोलकात्याच्या विदुषी इंद्राणी मुखर्जी यांच्याकडे त्यांचा अभ्यास सुरू आहे.
रोहिणी कुलकर्णी या अकॅडमी ऑफ म्युझिक संस्थेच्या संचालिका असून, ख्यातनाम गायिका आणि गुरु आहेत. सहाव्या वषी त्यांनी आपले काका गोविंदबुवा जोशी यांच्याकडून शिक्षण घेतले. पुढे पुण्यात एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठातून आणि विवाहोत्तर विदुषी जयश्री पाटणेकर, पंडित रामभाऊ विजापुरे, डॉ. भारती वैशंपायन व पंडित अरुण कुलकर्णी यांच्याकडून संगीत शिक्षण प्राप्त केले. त्यांना मुकुंद गोरे, सारंग कुलकर्णी, विशाल मोडक व संतोष पुरी यांची साथसंगत लाभणार आहे. रसिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.