ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता संजय दत्त मंगळवारी रात्री कोकीलाबेन रुग्णालयात दाखल झाला. काही दिवसांपूर्वी त्याला चौथ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते.
मंगळवारी रुग्णालयात उपचारासाठी जाताना त्याने माझ्यासाठी प्रार्थना करा असे आवाहन केले आहे. रुग्णालयात जाताना त्याच्यासोबत पत्नी मान्यता, बहिणी प्रिया दत्त आणि नम्रताही सोबत होते.
संजय दत्तला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची पत्नी मान्यता म्हणाली की, संजय दत्तवर मुंबईतच उपचार केले जाणार आहेत. उपचारासाठी सध्या तरी अन्य कुठे बाहेर जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे त्या म्हणाल्या, संजूच्या सर्व हितचिंतकांप्रती मी आभार व्यक्त करते, ज्यांनी संजयच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला प्रचंड शक्ती आणि आशीर्वादाची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून आमचं कुटुंब अनेक संकटांमधून गेलं. मला विश्वास आहे की, ही वेळ, हा प्रसंगही निघून जाईल. संजूच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय दत्तला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती पण ती निगेटिव्ह आली होती. पण त्याला चौथ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ट्विटरवरून त्याने काही काळ चित्रपटांपासून दूर राहणार असल्याचे जाहीर केले होते.