प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाबाधितांच्या संख्येत सोमवारी 46 ने भर पडली. त्यातल्यात्यात मुख्यमंत्र्यांच्या सांखळीमध्येच एकूण 25 जणांचा समावेश झाल्याने एकच खळबळ उडाली. राज्यात सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 724 झाली आहे. आतापर्यंत तीनजण मरण पावलेले आहेत. काहीजणांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली आहे. मांगोरहिलमधील बाधितांची संख्या 260 झाली आहे तर मांगोरहिलशी संबंधित बाधितांची संख्या 222 झाली आहे. राज्यातील जवळपास सर्व महत्वाच्या ठिकाणी कोरोनाबाधित सापडत असून नास्नोडा, वाडे, पिलार व वेर्णा येथे प्रत्येकी 1 प्रमाणे बाधित सापडले आहेत. राज्यातील शीघ्र गतीने कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन व राज्यात सांखळीसह नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याने संपूर्ण गोवाभर लॉकडाऊन नव्याने सुरू करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील जनतेत घबराट पसरलीय. लॉकडाऊनचे अनेक नियम शिथील करण्यात आल्यानंतर नव्याने सामूहिक संसर्गाचे मुख्य ठिकाण ठरले ते मांगोरहिल वास्को येथे. तेथून जो फैलाव सुरू झाला त्याने संपूर्ण गोव्यालाच विळखा घातला.
सुरुवातीपासूनच्या बाधितांची संख्या 1251
गेल्या 15 दिवसात राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1251 पर्यंत पोहोचली. त्यातील 524 जण बरे होऊन घरी पोहोचले तर 724 जण सक्रीय बाधित आहेत. विमान, रेल्वे व इतर साधनांद्वारे गोव्यात आलेले बाधित 104 जण आहेत. कुडतरी 28, मडगाव 17, आंबेली 16, केपे 10, लोटली 11, इंदिरानगर चिंबल 5, नावेली 6, गंगानगर म्हापसा 6, साळ डिचोली 3, काणकोण 6, नास्नोडा, पर्वरी, वाडे वास्को, पिलार वेर्णा या सर्व ठिकाणी प्रत्येकी 1 बाधित सापडला आहे.
राज्यात विविध ठिकाणी क्वारंटाईनमध्ये सध्या 409 बाधित
राज्यातील 8 ठिकाणे हे कोरोनासाठीचे हॉटस्पॉट ठरले आहेत. सरकारला या भागांची फार काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यातील विविध ठिकाणी क्वारंटाईनमध्ये सध्या 409 बाधित आहेत. सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार 1833 नमूने तपासणीसाठी घेतले असता 1367 जणांचा अहवाल नकारात्मक आला तर 53 जणांचा सकारात्मक व 413 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
टाळेबंदीसाठी सरकारवर दबाव वाढला
संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव येत आहे. सुरुवातीला मांगोरहिल मध्येच फैलावलेला हा कोरोना आता गोव्याच्या ग्रामीण भागातही फैलावला आहे. गावागावांबरोबरच वाडय़ावाडय़ांवर पोहोचू लागलाय. अनेक गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वत:च गावात टाळेबंदी लागू केली, मात्र सरकारने टाळेबंदी बाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. आता गोवाभर कोरोना फैलावत चालल्याने राज्यात नव्याने टाळेबंदी लागू करण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे.
मोठय़ा प्रमाणात सांखळीत तपासणी सुरू : मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या गावातच कोरोनाने थैमान घातलेले असून आतापर्यंत तीन दिवसात 31 रुग्ण सापडले आहेत. या बाबत पत्रकारांनी विचारले असता सांखळीत मोठय़ा प्रमाणात जनतेची तपासणी केली जात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र संपूर्ण गोव्यात पुन्हा टाळेबंदी सुरू करणार का? असे विचारता बघुया, अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले. …
सांखळी : आषाढी एकादशीचे भवितव्य अंधारात
गोव्याचे प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱया विठ्ठलपूर सांखळी येथील विठ्ठल मंदिरात ठरल्यानुसार उद्या 1 जुलै रोजी आषाढी एकादशीचा उत्सव होणार आहे. या संदर्भात मंदिराचे चेअरमन व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याशी संपर्क साधला असता बुधवारी सकाळी आपण मंदिरात जावून महाभिषेक करणार आहे. मंदिर बंद रहणार नाही. सर्वांनी काळजी घेऊनच अभिषेक करावा व सुरक्षित अंतर ठेवावे, असे ते म्हणाले. सांखळीत वाढत्या कोरोना प्रभावामुळे आता सांखळीत लॉकडाऊन झाले आहे. थ्यामुळे उद्या बुधवारी आषाढी एकादशीच्या उत्सवानिमित्त जनतेला महाभिषेक करण्यास मंदिरात जाण्याची संधी मिळणार का? असा प्रश्न आहे.
माजी आरोग्यमंत्र्यांच्या प्रकृतीत सुधारणा
मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याची माहिती कोविड हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या पत्नी व मुलीला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रविवारी फर्मागुडी-फोंडा येथील टुरिस्ट रेसिडेन्सित पाठविण्यात आले आहे.
माजी आरोग्यमंत्र्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली असली तरी अद्याप त्यांच्यावरील धोका टळलेला नाही. ते या संकटातून बाहेर यावे अशीच अपेक्षा कोविड हॉस्पिटलाचे डॉक्टर्स व इतर कर्मचारी बाळगून आहेत. सद्या कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात तिघांवर उपचार सुरू आहेत. काल सोमवारी दिवसभरात एकूण सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोविड हॉस्पिटलातील दोन परिचारीका पॉझिटिव्ह
दरम्यान, कोविड हॉस्पिटलातील दोन परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. गेल्या दोन दिवसामागे एक तर काल सोमवारी एक परिचारिका पॉझिटिव्ह आढळून आली आहे. काल पॉझिटिव्ह आढळून आलेली परिचारिका ही सांगे येथील असून गेले सलग 15 दिवस ती डय़ुटी बजावत होती. ती हॉस्पिसियो इस्पितळात नर्स म्हणून कार्यरत होती. मात्र, हल्लीच तिला कोविड हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.
डॉक्टर व नर्सेसवर कामाचा ताण
मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये डय़ुटी बजावणारे डॉक्टर व नर्सेस यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत असून काहीना सलग 15 दिवस डय़ुटी करावी लागत आहे. त्यांना रजा दिली जात नाही. त्याच बरोबर तक्रारही करता येत नाही. तक्रारीचा सूर काढला तर इतरत्र बदली करण्याची भाषा वापरली जाते. त्यामुळे सद्या येथील डॉक्टर व नर्सेसमध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झालेली आहे.
कोविड हॉस्पिटलाचा कारभार हॉस्पिसियो इस्पितळाच्या अधीक्षक डॉक्टर इरा आल्मेदा या हाताळीत असून त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सेस तसेच इतर कर्मचाऱयांना सातत्याने डय़ुटी करावी लागते. विश्रांतीसाठी पुरेसा वेळ दिला जात नसल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे. काही कर्मचाऱयांना डय़ुटी संपल्यानंतर थेट घरी पाठविले जाते. ते धोक्याचे असल्याचे मत देखील कर्मचाऱयांनी व्यक्त केले आहे.
कोविडमुळे मृत्यू येणाऱयांवर मडगावात अंत्यसंस्कार
कोविडमुळे मृत्यू येणाऱयांवर अंत्यसंस्कार करण्यास बऱयाच ठिकाणी विरोध होण्याची शक्यता असल्याने त्यावर उपाययोजना आखणे महत्वाचे होते. त्या दृष्टीकोनातून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी प्रयत्न चालविले होते. त्यांना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग उर्फ भाई नायक यांनी सहकार्य करताना मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मान्यता दिली आहे.
मठग्रामस्थ हिंदू सभेची स्मशानभूमी ही खाजगी असल्याने, मठग्रामस्थ हिंदू सभेला विश्वासात घेणे महत्वाचे होते. त्या प्रमाणे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष भाई नायक यांच्याकडे बोलणी केली व नंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱयाबरोबर संयुक्त बैठक घेतली व त्यात तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाई नायक यांनी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मान्यता दिली.
स्मशानभूमीची केली पाहणी
मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मान्यता मिळाल्यानंतर काल सोमवारी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मामलेदार विशाल कुंडईकर व मठग्रामस्थ हिंदू सभेचे सदस्य नारायण पै फोंडेकर यांच्यासहीत भेट देऊन पाहणी केली. कोविडमुळे मृत्यू येणाऱयांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी एक कक्ष ही निश्चित करण्यात आला.
मठग्रामस्थ हिंदू सभेने आपल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मान्यता दिल्याने सरकारसमोरील पेच कमी झाला आहे. मठग्रामस्थ हिंदू सभेने पूर्ण सहकार्य केल्याने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मठग्रामस्थ हिंदू सभेचे आभार मानले आहेत. कोविडमुळे मृत्यू येणाऱया व्यक्तीवर नातेवाईक प्रोटोकोल नुसार अंत्यसंस्कार करू शकतात. जर कुणी मृतदेह स्वीकारण्यास नकार दर्शविला तरच मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातील.