वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
भारत आणि जपानने दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांदरम्यान पुरवठा तसेच सेवांच्या आदान-प्रदानासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपानचे राजदूत सुजुकी सतोशी यांनी या करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे. या करारात सहकार्यासाठी रुपरेषा तयार करणे, माहितीचे आदान-प्रादन आणि दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांकडून परस्परांच्या सैन्यसुविधांच्या वापराचा मुद्दा सामील आहे. हा करार भारत आणि जपानच्या सशस्त्र दलांमधील द्विपक्षीय प्रशिक्षण कार्यक्रमांसह सेवा आणि पुरवठय़ांच्या आदान-प्रदानासाठी दृढ सहकार्याची रुपरेषा सक्षम करणारा असल्याचे म्हटले गेले आहे.
पूर्व चीन समुद्रात चिनी युद्धनौकांच्या वाढत्या घुसखोरीमुळे त्रस्त जपानने भारताकडून सहकार्य वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणांना तोंड देण्यासाठी व्यापक क्षेत्रीय प्रणाली निर्माण करण्याची सूचना केली आहे. संरक्षण मंत्री म्हणून चीन जपानच्या सुरक्षेसाठी धोका ठरल्याचे सांगू इच्छितो, असे त्यांनी म्हटले आहे.
हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत-जपानने सहकार्य करावे, आंतरराष्ट्रीय नियम आणि मापदंडांचे उल्लंघन करण्याप्रकरणी अतिरिक्त किंमत फेडण्यास चीनला भाग पाडावेच लागणार असल्याचे कोनो यांनी म्हटले आहे. शिंजो अबे यांनी राजीनामा दिल्यावर कानो यांना पंतप्रधानपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
स्थानिक समुद्रांमध्ये क्षेत्रीय दावे करण्याचा चीन आटोकाट प्रयत्न करत आहे. चीन आणि जपान यांच्यात पूर्व चीन समुद्रातील बेटांवरून तणाव निर्माण झाला आहे. चीन स्वतःचा प्रभाव वाढविण्यासाठी कोरोना महामारीचाही वापर करत आहे. पूर्व चीन समुद्रावरून चीनचा सर्व शेजारी देशांशी वाद आहे. या क्षेत्रात चिनी नौदल सातत्याने युद्धाभ्यास करत आहे.