प्रतिनिधी/ पणजी
मडगाव येथील ज्वेलर्स स्वप्नील वाळके खून प्रकरणातील संशयितांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयिन कोठडीत रवानगी केली आहे. दोनापावला येथून चोरी केलेल्या कार प्रकरणासंदर्भा पणजी पोलीस तपास करीत आहेत. संशयितांनी तक्रारदाराच्या घरातून रोख रक्कम तसेच मागडय़ा दारूच्या बाटल्यांचीही चोरी केली होती.
वाळके खून प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाने ओमकार पाटील मुस्तफा शेख व एव्हेंडर रॉड्रीक्स यांना अटक केली होती. खून प्रकरणात ज्या कारचा वापर करण्यात आला होता ती कार गाडी दोनापावला येथून संशयितांनी चोरी केली असल्याचे उघड झाल्यावर पणजी पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
खून प्रकरणातील तिन्ही संशयित अट्टल गुन्हेगार असून त्यांचा अनेक चोरी प्रकरणात समावेश असल्याचेही उघड झाले आहे. आगशी पोलिसांनीही त्यांना ताब्यात घेऊन विविध चोरी प्रकरणातील सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज तप्त केला आहे. खून प्रकरणात ज्या चाकूचा उपयोग केला होता तो चाकूही शिरोदना येथील एका बंगल्यातून चोरी केला असल्याचेही उघड झाले आहे. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.